प्रजासत्ताक दिनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते सकाळी 8.25 वा. ध्वजारोहण संपन्न झाले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दल व अग्निशमन दलाचे जवान आणि नागरिक मोठ्या संख्येने उत्साहात उपस्थित होते.
याप्रसंगी आयुक्तांसह सर्व विभागप्रमुखांची राष्ट्रीय पोषाखामध्ये पारंपारिक पध्दतीने फेटे परिधान करून असलेली उपस्थिती लक्षवेधी होती. नुकतेच नवी मुंबई महानगरपालिकेस कचरामुक्त शहरांमध्ये सेव्हन स्टार हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले असून सेव्हन स्टार मानांकन मिळविणारे नवी मुंबई हे देशातील केवळ दोन शहरांमधील एक शहर तसेच महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. त्याचे प्रतिक म्हणून मुख्यालयाच्या आतील पॅसेजमध्ये 7 स्टार मानांकन चितारणारी भव्य रांगोळी काढण्यात आली होती. रांगोळीसोबत अनेकजणांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
प्रजासत्ताक दिनानिमित्त महानगरपालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीस तिरंगी रंगात झळाळणारी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून ती बघण्यासाठी तसेच 225 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावरील मोठ्या प्रतिकात्मक राष्ट्रध्वजासह सेल्फी काढण्यासाठीही नागरिक मुख्यालय परिसराला सहकुटुंब भेट देत आहेत.
25 ते 27 जानेवारी या कालावधीत ही तिरंगी रोषणाई ठेवली जाणार आहे. आज प्रजासत्ताक दिनी हजारो नागरिकांच्या सोशल मिडीया स्टेटसवर तिरंग्यासह सेल्फी किंवा तिरंगी विद्युत रोषणाईत झळकणारे नमुंमपा मुख्यालयाचे छायाचित्र प्रदर्शित करण्यात आले होते.
Published on : 18-03-2024 14:02:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update