सर्वोच्च "सेव्हन स्टार" मानांकनाबद्दल अभिनंदन व नागरिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी आयोजित चित्ररथ रॅलीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत "स्वच्छ सर्वेक्षण 2023" मध्ये कचरामुक्त शहराचे सर्वोच्च सेव्हन स्टार मानांकन देशात केवळ दोनच शहरांना प्राप्त झाले असून त्यामध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव सप्ततारांकित शहर आहे. त्याचप्रमाणे देशातील स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई व्दितीय क्रमांकाने (तांत्रिकदृष्टया तृतीय) नावाजली गेली आहे. या यशाचे खरे मानकरी स्वच्छताकर्मी, सफाईमित्र, स्वच्छताप्रेमी नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रसारमाध्यमे असल्याचे महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी महामहीम राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते पुरस्कार स्विकारल्यानंतर सांगितले होते.
त्या अनुषंगाने ज्या नागरिकांमुळे हा पुरस्कार व सेव्हन स्टार हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले त्या नागरिकांचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या सेव्हन स्टार चित्ररथ रॅलीला नागरिकांचा ठिकठिकाणी उत्तम प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नागरिकांच्या बहुमोल सहकार्यामुळेच हे मानांकन लाभले असे सांगत चित्ररथ रॅलीच्या माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत पोहचून त्यांचे आभार मानण्यासाठी व स्वच्छ सर्वेक्षण 2024 ला सामोरे जाताना निश्चय केला नंबर पहिला हे आपले ध्येय साध्य करण्यासाठी मानांकन उंचावण्याच्या दृष्टीने अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
वाशी रेल्वे स्टेशनसमोरून इनॉर्बिट मॉलपासून सुरू झालेल्या या सेव्हन स्टार चित्ररथ रॅलीचे घणसोलीच्या डि मार्टपर्यंत नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फुर्त स्वागत करीत अशा आगळ्यावेगळ्या पध्दतीने पुरस्काराचा आनंद साजरा करण्याच्या व नागिरकांचे आभार मानणा-या पध्दतीचे कौतुक केले.
आकर्षक विद्युत रोषणाईने सजलेल्या गाडीवर कचरामुक्त शहराच्या 'सेव्हन स्टार' मानांकनाचे प्रतिकचिन्ह लक्ष वेधून घेत शीर्षस्थानावर झळकत होते. त्याखाली नागरिकांचे सेव्हन स्टार मानांकनाबद्दल अभिनंदन करणारा व ते मिळविण्यासाठी केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल आभार मानणारा फलक लावण्यात आला होता. स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड ॲम्बेसेडर तथा सुप्रसिध्द गायक, संगीतकार श्री. शंकर महादेवन यांचे छायाचित्र असलेला मोठा फलक यात्रेची शोभा वाढविणारा होता. त्याच्या पुढील भागात 'थ्री आर' संकल्पनेचे म्हणजेच कचरा कमी करणे (Reduce), कचऱ्याचा पुनर्वापर करणे (Reuse) व कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) याबाबत जनजागृती करणारे थ्रीडी होर्डींग झळकत होते.
*त्यामागील चित्ररथावर आरंभ क्रिएशन्सच्या नृत्य कलावंतांनी स्वच्छता गीतांप्रमाणेच भारतीय लोककला व संस्कृती यावर आधारित नृत्यगीतांचे वाशी रेल्वे स्टेशन ते घणसोली डी मार्ट इतके मोठे अंतर असूनही कलात्मक सादरीकरण करीत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये अनेक गाण्यांतून नृ्त्यांव्दारे स्वच्छतेचा, ओला-सुका-घरगुती घातक कचरा वर्गीकरणाचा, थ्री आर संकल्पनेचा प्रचार करण्यात आला. या संपूर्ण प्रवासात हजारो नवी मुंबई नागरिकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमे-यावर हा सेव्हन स्टार अभिनंदन व आभार सोहळा छायाचित्रे काढत तसेच व्हिडिओ रेकॉर्डींग करीत संस्मरणीय केला. अनेकांची सोशल मिडियावरील वॉल यापुढील काळात या अतिशय देखण्या सोहळ्याने सजलेली असेल.*
स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मध्ये 'सेव्हन स्टार' हे कचरामुक्त शहराचे सर्वोच्च मानांकन मिळविणे व हे मानांकन मिळविणारे देशात दोनच शहरे असणे व त्यामध्ये नवी मुंबई हे एकमेव शहर असणे ही समस्त नवी मुंबई नागरिकांसाठी अत्यंत अभिनंदनीय गोष्ट असून हा आनंदक्षण नवी मुंबई महानगरपालिकेने चित्ररथाच्या माध्यमातून अत्यंत वेगळ्या प्रकारे नागरिकांपर्यंत पोहचत नागरिकांसमवेत साजरा केला.
याप्रसंगी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर तसेच अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, घननकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री. दिलीप नेरकर, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, वाशी विभागाचे सहा. आयुक्त श्री. सागर मोरे यांनी वाशी रेल्वे स्टेशन जवळील इनॉर्बिट मॉल, छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी, कोपरखैरणे - वाशी मुख्य रस्ता येथून महापे उड्डाणूपूलाजवळील कॉर्नर व पुढे पामबीचमार्गावरून डि मार्ट घणसोली पर्यंत अशा मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधत त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
*'निश्चय केला नंबर पहिला' हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरे जात असताना नवी मुंबईस लाभलेले कचरामुक्त शहराचे सर्वोच्च 'सेव्हन स्टार' मानांकन प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकासाठी अभिमानाचे असून याचे संपूर्ण श्रेय नागरिकांचे आहे. नागरिक स्वच्छतेबाबत जागरूक असतील तर स्वच्छतेमधील कोणतेही मानांकन अशक्य नाही. त्यामुळे चित्ररथासारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनेव्दारे नागरिकांचे अभिनंदन व आभार मानण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्याला मिळालेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद समाधान देणारा आहे. तरी यापुढील काळातही नागरिकांनी स्वच्छतेबाबत अधिक जागरूक होऊन आपल्या घरातील ओला, सुका आणि घरगुती घातक कच-याचे घरातच वर्गीकरण करावे आणि महानगरपालिकेच्या घंटागाडीतही हा कचरा वेगवेगळा देण्याची दैनंदिन सवय करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 19-03-2024 12:00:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update