आंब्याच्या कोयी संकलन उपक्रमात 50 हजाराहून अधिक कोयी जमा करत नागरिकांचा पर्यावरणशील सहभाग
वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शहर स्वच्छतेत तसेच पर्यावरण रक्षण – संवर्धनात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली असून याच धर्तीवर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंब्याच्या कोयी (Mango Seeds) संकलनाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमाचे नागरिकांकडून महानगरपालिकेची प्रशंसा करीत उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले असून या उपक्रमास उत्तम प्रतिसाद देत 50 हजाराहून अधिक आंब्याच्या कोयींचे संकलन करण्यात आले आहे.
यामध्ये शहरातील ज्युस सेंटर्स, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स येथून आंब्याच्या कोयी संकलन करण्यात येत आहेतच शिवाय सोसायट्यांमधील नागरिकही आपल्याकडील आंब्याच्या कोयी धुवून व सुकवून महानगरपालिकेने यासाठी तयार केलेल्या विशेष वाहनात देत आहेत.
स्वच्छ भारत मिशनमध्ये कच-याचे वर्गीकरण हा अत्यंत महत्वाचा घटक असून कोयी संकलन उपक्रमामुळे सर्वसाधारणपणे नागरिकांकडून ओल्या कच-यात टाकून दिल्या जाणा-या कोयी वेगळ्या काढल्या जाणार असून त्या कोयींतून वृक्षरोपे तयार केली जाणार असल्याने निसर्गाचे देणे निसर्गाला परत करून वसुंधरा रक्षण – संवर्धनाचेही काम होणार आहे.
आंब्याच्या कोयी (Mango Seeds) संकलनासाठी परिमंडळ 1 व परिमंडळ 2 क्षेत्रासाठी विशेष वाहने तयार करण्यात आली असून ही वाहने त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रात फिरून नागरिक व संबंधित व्यावसायिकांकडून कोयी संकलित करीत आहेत.
हा उपक्रम ‘रेड एफएम’ या लोकप्रिय एफएम रेडिओ वाहिनीमार्फत राबविल्या जाणा-या ‘गुठली रिटर्न्स’ या उपक्रमाशी सुसंगत आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडे मोठ्या प्रमाणात जमा होणा-या आंब्याच्या कोयींमधून नमुंमपा उद्यान विभागामार्फत आंब्याची रोपे निर्माण करण्यासाठी काही कोयी ठेवून अधिकच्या कोयी रेड एफएम रेडिओ वाहिनीकडे सुपूर्द केल्या जाणार आहेत. वाहिनीकडे संकलित होणा-या कोयी ते ग्रामीण भागातील शेतक-यांपर्यंत आंबा रोप लागवडीसाठी पोहोचवून त्यांना शेतीसोबत उदरनिर्वाहाचा आणखी एक पर्याय उपलब्ध करून देत आहेत.
गुठली रिटर्न्स या पर्यावरणपूरक उपक्रमासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या पुढाकाराचे रेड एफएम वाहिनीव्दारे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले असून याविषयी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याशी आरजे मलिष्का यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वाहिनीवरून थेट संवादही साधला आहे. रेड - एफएम वाहिनीच्या हजारो श्रोत्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेने गुठली रिटर्न्स उपक्रमात सहकार्याची भूमिका घेतल्याबद्दल कौतुक केले आहे.
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी साधारणत: 1 लाख आंब्याच्या कोयी वाहिनीव्दारे शेतक-यांना उपलब्ध करुन देणार असल्याचे वाहिनीव्दारे प्रसारित केलेल्या संवादप्रसंगी सांगितले असून नवी मुंबईतील वृक्ष संवर्धनासोबतच महानगरपालिकेमार्फत रेड एफएम वाहिनीच्या गुठली रिटर्न्स या उपक्रमाच्या माध्यमातून शेतक-यांना सहकार्य करुन सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.
तरी नागरिकांनी आंब्याचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर त्यांच्या कोयी ओल्या कच-यात न टाकता एखाद्या भांड्यात स्वच्छ धुवून घ्याव्यात आणि उन्हात सुकवाव्यात व नवी मुंबई महानगरपालिकेने यासाठी तयार केलेल्या विशेष वाहनात 15 जूनपर्यंत वर्तमानपत्रात गुंडाळून अथवा बॉक्समध्ये द्याव्यात असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 12-06-2024 13:12:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update