स्वच्छ सर्वेक्षण 2019 मधील राष्ट्रीय पुरस्काराबद्दल महासभेत अभिनंदन

“स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2019” मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस “नागरिक प्रतिसाद (Citizen Feedback) क्षेत्रात देशातील सर्वोत्तम शहर पुरस्कार त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये सहभागी 4237 शहरांमधून नवी मुंबई शहराला देशातील सातव्या क्रमांकाचे स्वच्छ शहर तर महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले. याबद्दल सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे यांनी मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा ठराव मांडला. या निमित्त महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नवी दिल्ली येथील विशेष समारंभात नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान करण्यात आलेली पुरस्काराची स्मृतिचिन्हे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्याकडे सुपुर्द करत सभागृहापुढे सादर केली.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी महापौर श्री. जयवंत सुतार यांचा नवी मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून विशेष सन्मान केला. उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे यांनाही सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचा विशेष गौरव करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समितीच्या सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, प्रभाग समितीच्या अध्यक्ष श्रीम. कविता आगोंडे, श्री. शशिकांत राऊत, श्रीम. मुद्रीका गवळी, श्रीम. अनिता मानवतकर, श्रीम. दिपा गवते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, शिवसेना पक्ष प्रतोद श्री. व्दारकानाथ भोईर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रतिनिधी नगरसेविका श्रीम. हेमांगी सोनावणे, भारतीय जनता पार्टी प्रतिनिधी नगरसेवक श्री. सुनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका अमृत योजनेअंतर्गत टॉप टेन शहरांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर असल्याचा विशेष उल्लेख करीत नवी मुंबई महानगरपालिकेस थ्रीस्टार रेटींग व ओडीएफ डबल प्लस रेटींग मिळाल्याबद्दलही अभिनंदन करण्यात आले.
महापौर श्री. जयवंत सुतार यांनी आपल्या मनोगतात हा पुरस्कार जनतेला समर्पित करीत असल्याची भावना व्यक्त करीत माझा कचरा, माझी जबाबदारी ही संकल्पना प्रत्यक्षात आणणा-या नवी मुंबईतील सर्व वयोगटातील नागरिकांचे आभार मानले. लोकप्रतिनिधी व अधिकारी – कर्मचारी तसेच सफाई कामगार यांच्याही योगदानाचा महापौरांनी विशेष उल्लेख केला.
उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुरस्कारामध्ये स्वत:चे घर स्वच्छ ठेवण्याबरोबरच आपला परिसर व शहर कसे स्वच्छ राहिल याकडे बारकाईने लक्ष देणा-या महिलांच्या योगदानाबद्दल भाष्य केले.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी चारही सर्वेक्षणात सातत्याने टॉप टेनमध्ये येणारी महानगरपालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचा गौरव होतो तेव्हा हे सातत्य राखण्यात महत्वपूर्ण योगदान देणा-या नागरिकांचे हे श्रेय आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. यापेक्षा अधिक चांगले काम करत सर्वांच्या सहयोगाने स्वच्छतेचा आदर्श निर्माण करण्याचा यापुढील काळात प्रयत्न राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे यांनी नवी मुंबईच्या मागील वर्षातील पुरस्कारांचा उल्लेख करीत हा आलेख असाच उंचावत राहिल असा विश्वास व्यक्त करीत अभिनंदनाचा ठराव मांडला व त्याला शिवसेना पक्षप्रतोद श्री. व्दारकानाथ भोईर यांनी सर्व घटकांचे अभिनंदन करत अनुमोदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, शिवसेना पक्ष प्रतोद श्री. व्दारकानाथ भोईर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रतिनिधी नगरसेविका श्रीम. हेमांगी सोनावणे, भारतीय जनता पार्टी प्रतिनिधी नगरसेवक श्री. सुनिल पाटील यांनीही अभिनंदनपर भाष्य केले.
Published on : 08-03-2019 20:17:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update