'स्वच्छ सर्वेक्षण 2020' मध्ये नवी मुंबईला नंबर वन बनविण्यासाठी नवी मुंबईकर सज्ज
'सश्य श्यामला धरा नवी मुंबईची आहे' असे म्हणत 'वचन स्वच्छतेचे घेऊ हाती, होणार निरोगी आता नवी मुंबईची माती' या गीतकार धनश्री देसाई यांनी लिहिलेल्या व गायक रोहित शास्त्री यांनी संगीतबध्द करून गायलेल्या 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' च्या विशेष गीताला नागरिकांची उत्तम साथ मिळत असल्याचा प्रत्यय नेरूळच्या सी वूड येथील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये आला.
पॅशन स्टुडिओच्या सुषमा सिंग यांच्या नृत्य समुहाने रविवारी संध्याकाळी 7 वाजता मॉलमध्ये अनपेक्षितपणे सादर केलेल्या फ्लॅश मॉबमध्ये त्याठिकाणी उपस्थित शेकडो नागरिकांपैकी अनेकांनी स्वच्छता गीतावर त्यांच्यासह नृत्याचा ताल धरला आणि स्वच्छ सर्वेक्षणात आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. याशिवाय अनेक नागरिकांनी तेथे ठेवलेल्या प्लास्टिक प्रतिबंधाच्या सेल्फी पॉईंटसोबत वैयक्तिक व कुटुंबासमवेत छायाचित्रे काढून मोठ्या संख्येने सोशल मिडियावर प्रसिध्दही केली.
'स्वच्छ सर्वेक्षण 2020' च्या अनुषंगाने नवी मुंबई शहरात स्वच्छतेचे वारे वाहताना दिसताहेत. नवी मुंबईचे रूपही सुशोभिकरणाव्दारे पालटताना दिसत असल्याचे संतोषजनक अभिप्राय नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. अर्थातच स्वच्छतेच्या मानांकनात नागरिकांचा सहभाग सर्वातच महत्वाचा असून त्यादृष्टीने नागरिक सहभाग वाढविण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर केला जात आहे.
अशाच प्रकारचा फ्लॅश मॉबसारखा अभिनव प्रयोग गीतकार धनश्री देसाई, गायक रोहित शास्त्री व नृत्य दिग्दर्शक सुषमा सिंग यांनी आपल्या सहका-यांसह ग्रँड सेंट्रल मॉलसारख्या वर्दळीच्या ठिकाणी रविवारी अधिक गर्दी असते हे लक्षात घेऊन केला आणि नागरिकांनीही त्याला उत्साहाने दाद देत स्वच्छता गीतावर नृत्य ताल धरला.
नवी मुंबईच्या स्वच्छता अभियानात 'आम्ही कमीत कमी कचरा करून सहकार्य करू, केलेला कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणार नाही व तसा कुणी टाकत असल्यास त्याला समजून सांगू' अशा प्रतिक्रिया देत अनेक नागरिकांनी 'माझा कचरा ही माझी जबाबदारी आहे हे आम्हांला पटले आहे, त्यामुळे आम्ही घरापासूनच ओला व सुका कचरा वेगवेगळा करत असतो' हे अभिमानाने सांगितले. संपूर्ण नवी मुंबई शहराचे रूप यावर्षी खूपच बदललेले दिसत आहे असे सांगत अनेक नागरिकांनी नवी मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक केले.
Published on : 13-01-2020 10:38:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update