'गणेशोत्सव 2020' नियोजनाविषयी महानगरपालिकेच्या आठ विभाग स्तरावर बैठका संपन्न
22 ऑगस्टपासून गणेशोत्सव 2020 ला प्रारंभ होत असून यावर्षी कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा उत्सव आरोग्यपूर्ण रितीने निर्विघ्नपणे साजरा व्हावा याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत उत्सव आयोजनाच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत. या सूचनांबाबत माहिती देण्यासाठी व गणेशोत्सव साजरा करताना घ्यावयाच्या काळजीविषयी विचारविनीमय करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार सोशल डिस्टन्सींगच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय स्तरावर उस्वव मंडळांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
महानगरपालिकेच्या बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या आठही विभाग क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आपापल्या विभागातील बैठकांप्रसंगी उपस्थित होते. यावेळी संबंधित विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या वतीने उपस्थितांना माहिती देण्यात आली तसेच प्रबोधन करण्यात आले.
कोव्हीड 19 ची परिस्थिती बघता यावर्षीचा गणेशोत्सव उत्साहात मात्र सजावटीतील भपकेबाजपणा टाळून साधेपणाने सोशल डिस्टन्सींग, सॅनिटायझर, मास्क अशा सर्व सुरक्षा साधनांचा वापर करून साजरा करण्यात यावा. गणेशोत्सवातून आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. मंडप उभारणी सर्व प्रकारची रितसर परवानगी घेऊन करण्यात यावी. श्रीगणेमूर्तींची उंची ही सार्वजनिक उत्सवाकरिता 4 फूट व घरगुती उत्सवाकरिता 2 फूटांपर्यंत असावी. अशा विविध प्रकारच्या शासकीय मार्गदर्शक सूचनांची माहिती यावेळी देण्यात आली.
त्याचप्रमाणे शक्यतो घरातील धातू / संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे व शाडूची / पर्यावरणपूरक मूर्ती असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे असेही सूचित करण्यात आले. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत असे सांगतानाच आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत:चे व कुटूंबियांचे साथीच्या रोगापासून रक्षण करावे. त्यातही महत्वाचे म्हणजे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे सूचित करण्यासोबतच सर्व गणेशोत्सव मंडळांनी नवी मुंबई महापालिकेच्या http:/www.rtsnmmconline.com या संकेतस्थळावर गणेशोत्सवातील मंडप उभारणी करीता परवानगी अर्ज दाखल करावेत अशी माहिती देण्यात आली. या ऑनलाईन प्रणालीव्दारे उत्सवाच्या 10 दिवस अगोदर परवानगी देणे बंद करण्यात येणार असून सर्व संबधीत विभागांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरु करण्यात येऊ नये तसेच केवळ परवानगी अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहीत धरण्यात येऊ नये असे सूचित करतानाच कोणत्याही मंडपाची उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपांवर निष्कासनाची कार्यवाही केली जाईल याची नोंद घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीप्रसंगी महानगरपालिका व पोलीस अधिकारी यांच्याप्रमाणेच वाहतूक पोलीस निरीक्षक, अग्निशमन अधिकारी उपस्थित होते. यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करताना सर्व मंडळांनी सद्यस्थितीचा विचार करून सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन याप्रसंगी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांना करण्यात आले.
Published on : 25-07-2020 18:28:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update