*स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये लघुपट, जिंगल, भित्तीचित्र, पथनाट्य, चित्रकला स्पर्धा सहभागाचे आवाहन *

'स्वच्छ सर्वेक्षण 2022' मध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान मिळविण्यात नवी मुंबईकर नागरिक यांच्या सक्रीय सहभागाचा तसेच सफाई कामगारांच्या नियमित कामाचा महत्वाचा वाटा असल्याचे महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी वेळोवेळी जाहीर केले आहे. या धर्तीवर स्वच्छ सर्वेक्षण 2023 ला सामोरे जाताना व्यापक लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे.
याकरिता स्वच्छतेविषयीच्या नागरिकांच्या मनात असलेल्या विविध संकल्पनांना मुक्त व्यासपीठ मिळावे व या माध्यमातून स्वच्छतेचा प्रचार – प्रसार व्हावा यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लघुपट, जिंगल, भित्तीचित्र, पथनाट्य व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक स्पर्धेकरिता आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून स्पर्धांविषयीच्या अधिक माहितीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या फेसबुक, ट्विटर व इंन्टाग्राम च्या @nmmconline या अधिकृत सोशल मिडिया पेजला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
चित्रकला स्पर्धेकरिता (1) माझे शहर – माझा सहभाग. (2) प्लास्टिकमुक्त नवी मुंबई आणि (3) 3R (Reduce, Reuse, Recycle) हे 3 विषय जाहिर करण्यात आलेले आहेत. दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी कोपरखैरणे सेक्टर 14 येथील निसर्गौद्यानामध्ये या स्पर्धा सकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आल्या असून चित्र काढण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कागद देण्यात येईल. चित्रांकरिता लागणारे रंग व साहित्य स्पर्धकाने स्वत: आणायचे आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट 3 स्पर्धकांना रु.10 हजार, रु.7 हजार व रु.5 हजार रक्कमेची पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. स्पर्धेतील सहभागासाठी shorturl.at/suVY9 या लिंकचा वापर करावयाचा आहे.
भित्तीचित्र स्पर्धेकरिता (1) माझे शहर – माझा सहभाग. (2) प्लास्टिकमुक्त नवी मुंबई आणि (3) 3R (Reduce, Reuse, Recycle) या 3 विषयांपैकी एका विषयावर दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता महापालिका मुख्यालय आवारातील निश्चित केलेल्या भिंतीवर अडीच तासाच्या अवधीत 2’ X 2’ आकारात भित्तीचित्र काढावयाचे असून सर्वोत्कृष्ट 3 स्पर्धकांना रु.10 हजार, रु.7 हजार व रु.5 हजार रक्कमेची पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. स्पर्धेतील सहभागासाठी shorturl.at/suVY9 या लिंकचा वापर करावयाचा आहे.
पथनाट्य स्पर्धेकरिता 7 ते 10 मिनिटांच्या कालावधीत (1) माझे शहर – माझा सहभाग. (2) प्लास्टिकमुक्त नवी मुंबई आणि (3) 3R (Reduce, Reuse, Recycle) या 3 विषयांपैकी एका विषयावर दि. 25 व 26 नोव्हेंबर 2022 रोजी पथनाट्य सादर करावयाचे असून पथनाट्य समुहात किमान 5 आणि जास्तीत जास्त 7 कलावंत असणे आवश्यक आहे. पथनाट्य सादरीकरणामध्ये कुठल्याही राजकिय, धार्मिक, हिंसक किंवा अपशब्दांचा वापर नसावा. दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर विहित वेळ मर्यादेतच सादरीकरण करावयाचे असून दि.24 नोव्हेंबर 2022 पर्यंत shorturl.at/suVY9 या लिंकवर अर्ज भरावयाचा आहे. सर्वोत्कृष्ट 3 स्पर्धकांना रु.10 हजार, रु.7 हजार व रु.5 हजार रक्कमेची पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
जिंगल स्पर्धेकरिता 'स्वच्छ - सुंदर नवी मुंबई' या विषयावर आधारित 1 ते 3 मिनीटे कालावधीची मराठी भाषेतील जिंगल MP 3 फॉर्मेटमध्ये सादर करावयाची असून त्यामध्ये 'निश्चय केला - नंबर पहिला' हे घोषवाक्य अंतर्भूत असणे गरजेचे आहे. सर्वोत्तम 3 जिंगल्सना अनुक्रमे रु.15 हजार, 10 हजार, 7 हजार अशी पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. जिंगल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी shorturl.at/suVY9 या लिंकवर दि. 24 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत नोंदणी करावयाची आहे.
लघुपटाच्या माध्यमातून स्वच्छ व सुंदर नवी मुंबईचे चित्र मांडले जावे व स्वच्छताविषयक जागरुकता निर्माण व्हावी याकरिता 'लघुपट स्पर्धा (Short Film Compitation)' आयोजित करण्यात आली असून यामध्ये सहभागाकरिता (1) माझे शहर - माझा सहभाग, (2) प्लास्टिकमुक्त नवी मुंबई, (3) 3R (Reduce, Reuse, Recycle) या 3 पैकी एका विषयावर लघुपट निर्मिती करावयाची आहे. यामधील पहिल्या 3 क्रमांकाच्या लघुपटांना अनुक्रमे रु.15 हजार, 10 हजार व 7 हजार रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. लघुपटाचे छायाचित्रीकरण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातच करणे बंधनकारक असून लघुपटाचा कालावधी नामावलीसह 2 ते 5 मिनिटांचाच असणे बंधनकारक आहे. shorturl.at/suVY9 या लिंकवर दि. 24 नोव्हेंबर 2022 रात्री 12 वाजेपर्यंत लघुपट स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख आहे.
शहर स्वच्छतेत नवी मुंबईकर नागरिकांचा नेहमीच महत्वाचा सहभाग राहिला असून विशेषत्वाने युवक व विद्यार्थी यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या अनुषंगाने नागरिकांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहित करावे व त्यामधून स्वच्छता जनजागृती कार्यामध्ये हातभार लागावा यादृष्टीने लघुपट, जिंगल, भित्तीचित्र, पथनाट्य व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन विद्यार्थी, युवक व नागरिकांनी हे उपक्रम नेहमीप्रमाणेच यशस्वी करावेत असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 16-11-2022 13:21:57,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update