*5 हजारांहून अधिक नागरिकांनी 'मायबोली मराठी' सुलेखन प्रदर्शनाला भेट देत अनुभवला अक्षरानंद*
जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात 25 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात आलेले 'मायबोली मराठी' हे खुले सुलेखन प्रदर्शन' पाच हजाराहून अधिक नागरिकांनी अनुभवत अक्षरानंद घेतला. जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद बघत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या प्रदर्शनाचा कालावधी आणखी 2 दिवस वाढवित 1 मार्च पर्यंत केला आहे. त्यामुळे ज्यांनी हे प्रदर्शन अनुभवलेले नाही ते नागरिकही या प्रदर्शनाचा अनुभव घेऊ शकतात.
मराठी भाषा संवर्धनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असून त्यामधील एक अभिनव उपक्रम जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलिग्राफी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये मराठी साहित्यातील वाचनीय कविता, विचार यांचे सुप्रसिध्द सुलेखनकार श्री. अच्युत पालव व त्यांचे सुलेखनकलेतील शिष्य यांच्या सुंदर हस्ताक्षरातील प्रदर्शन साकारण्यात आलेले आहे.
या प्रदर्शनाला केवळ नवी मुंबईकरच नव्हे तर नवी मुंबईत विविध कामांसाठी येणारे इतर शहरांतील नागरिकही आवर्जुन भेट देत असून या उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक करीत आहेत. विशेष म्हणजे लहान मुलांसह प्रदर्शनाला भेट देणा-या पालकांचे प्रमाणही लक्षणीय होते. 27 फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिनी तर अनेक कुटुंबांनी आपली संध्याकाळ अक्षरांच्या साथीने सेल्फी काढत संस्मरणीय केली. सुप्रसिध्द रंगावलीकर श्री. श्रीहरी पवळे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी चौकात काढलेल्या रांगोळीचेही नागरिकांना विशेष आकर्षण होते.
प्रदर्शनाठिकाणी नागरिकांच्या अभिप्रायाकरिता ठेवलेल्या वहीतील अभिप्रायांचे निरीक्षण केले असता प्रदर्शनामुळे लोकांना झालेल्या आनंदाचे व मराठी भाषेच्या थोरवीचे दर्शन घडते.
वसई येथील संजय पुंडकर यांनी 'अक्षरांची जादू अनुभवयाला मिळाली' अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत तर वाशीच्या रूपाली ठोंबरे यांनी 'डोळ्यांचे पारणे फिटले' अशा शब्दात आपले अभिप्राय नोंदविले आहेत. सानपाडा येथील तेजश्री अण्णीगेरी यांनी 'सुंदर अक्षरांनी कविता अधिक सुंदर झाल्याचा अनुभव मिळाला' असे म्हटले आहे. कांदिवलीच्या रसिका कोरेगांवकर यांनी 'वाचनीय साहित्य सुयोग्य सुलेखनाने खुलले' असे नोंदविले आहे तर आर्किटेक्ट तेजस्विनी पंडित यांनी 'एक अविस्मिरणीय अनुभव' अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ऐरोलीच्या सुप्रिया पाठारे यांनी 'प्रदर्शन पाहताना मराठी भाषेविषयीचा अभिमान उंचावत गेला' असे म्हटले आहे तसेच कोपरखैरणे येथील संतोष लवंगारे यांनी 'सुलेखनातून उमटलेला साक्षात अक्षरांचा अनुभव आनंददायी होता' असे अभिप्राय नोंदविले आहेत. पनवेल येथील वैष्णवी जुवेकर यांनी 'सर्व लिखाण कौतुकास्पद, नितांतसुंदर प्रदर्शन' असा अनुभव मांडला आहे तर बेलापूर येथील हर्षदा कनठाळे यांनी 'प्रदर्शनातील सुलेखन पाहून आज पुन्हा नव्याने मराठी भाषेच्या प्रेमात पडले' असे म्हटले आहे. ऐरोली येथील नितीन स्वामी यांनी 'सुरेख वळणदार मराठी अक्षरांची मेजवानी घडली' अशा शब्दांत या प्रदर्शनाची प्रशंसा केली आहे.
नागरिकांचा असा उत्फुर्त व विविधांगी प्रतिसाद लक्षात घेऊन अधिकाधिक नागरिकांना हे सुलेखन अक्षर प्रदर्शन अनुभवता यावे याकरिता प्रदर्शनाची मुदत 2 दिवसांनी वाढविण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांनी याठिकाणी भेट देऊन मराठी भाषा वैभवाचा अनुभव घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 03-03-2022 06:05:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update