दीड दिवसांच्या 9871 श्रीगणेशमूर्तींचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या चोख व्यवस्थेत भावपूर्ण वातावरणात विसर्जन




19 सप्टेंबर रोजीच्या श्रीगणेश चतुर्थीपासून प्रारंभ झालेल्या श्रीगणेशोत्सवात दीड दिवस कालावधीतील श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच 141 कृत्रिम विसर्जन स्थळे अशा 161 विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या 9871 श्रीगणेश मूतींना भावभक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.
सर्व विसर्जन स्थळांवर नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, नवी मुंबई महानगरपालिकेने चोख व्यवस्था केली होती. विभाग कार्यालयांमार्फत आपापल्या क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर श्रीमूर्ती विसर्जनासाठी स्वयंसेवक तत्पर होते. 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 7211 घरगुती तसेच 25 सार्वजनिक मंडळांच्या 7236 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 141 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 2628 घरगुती तसेच 7 सार्वजनिक मंडळांच्या 2635 श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशा प्रकारे 9839 घरगुती व 32 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 9871 श्रीमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले.
यामध्ये बेलापूर विभागात 5 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1954 घरगुती व 10 सार्वजनिक तसेच 19 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 345 घरगुती व 3 सार्वजनिक श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन झाले.
नेरुळ विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 983 घरगुती तसेच 26 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 365 घरगुती श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.
वाशी विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 697 घरगुती व 02 सार्वजनिक तसेच 16 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 342 घरगुती श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
तुर्भे विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 401 घरगुती व 03 सार्वजनिक तसेच 17 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 454 घरगुती व 3 सार्वजनिक श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन झाले.
कोपरखैरणे विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 898 घरगुती तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 383 घरगुती श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.
घणसोली विभागात 4 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1210 घरगुती व 06 सार्वजनिक तसेच 21 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 244 घरगुती श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
ऐरोली विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 857 घरगुती व 04 सार्वजनिक तसेच 18 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 408 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.
दिघा विभागात 1 नैसर्गिक विसर्जन स्थळावर 211 घरगुती तसेच 09 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 87 घरगुती श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.
अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 163 विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या 9871 श्रीगणेशमूर्तींना निरोप देण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विसर्जन स्थळांवर गर्दी होऊ नये तसेच नैसर्गिक जलस्त्रोत शुध्द रहावेत याकरिता कृत्रिम तलावांचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. त्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात 141 इतक्या मोठया संख्येने नागरिकांना सोयाीच्या ठिकाणी विभागाविभागांमध्ये कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली होती. त्याला पर्यावरणशील दृष्टीकोन जपणा-या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 2635 श्रीगणेशमूर्तींचे भाविकांनी आपल्या घराजवळच्या कृत्रिम तलावात विसर्जन केले.
त्याचप्रमाणे 14 मुख्य विसर्जन तलावांमधील जलाशय प्रदूषित होऊ नयेत यादृष्टीने फार आधीपासूनच या तलावांतील विशिष्ट भागामध्ये विसर्जन करता यावे यादृष्टीने गॅबियन वॉल रचना करण्यात आली असून त्याचाही वापर मोठया प्रमाणावर करीत नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जन सोहळा पार पडण्यावर भर दिला.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे विसर्जन व्यवस्थेवर बारकाईने लक्ष होते. अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ यांनी विर्सजन स्थळांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची प्रत्यक्ष पहाणी केली. परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ श्रीराम पवार हे देखील संबधित विभाग अधिका-यांसह आपापल्या परिमंडळ क्षेत्रात भेटी देत होते.
सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी तराफ्यांची व्यवस्था तसेच उपस्थित भाविकांना महत्वाच्या सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपकासह व्यासपीठ व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्थाही आहे. मुख्य विसर्जन स्थळांवर नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय पथके तैनात असून संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून स्वयंसेवक, लाईफगार्ड्स व्यवस्था अधिक कृतीशीलपणे कार्यरत होती. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यरत होते.
नवी मुंबई हे स्वच्छतेत अग्रणी असलेले शहर असून विसर्जनस्थळी भाविकांनी जलाशयामध्ये निर्माल्य टाकू नये असे आवाहन करण्यात आले असून प्रत्येक विसर्जनस्थळी ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले आहेत. दीड दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये 10 टन 945 किलो निर्माल्य संकलित झालेले आहे. हे निर्माल्य स्वतंत्र वाहनांव्दारे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्याठिकाणी निर्माल्याचे पावित्र्य राखून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनीदेखील ठिकठिकाणी भेटी देत स्वच्छता कार्याला वेग दिला.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. मिलींद भारंबे यांच्या मार्गदर्शनानुसार परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त श्री. विवेक पानसरे व वाहतूक पोलीस विभागाचे उपआयुक्त श्री. तिरुपती काकडे यांच्या नियंत्रणाखाली पोलीस यंत्रणाही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने दक्षतेने कार्यरत होती.
दीड दिवस कालावधीचे श्रीगणेशमूर्ती विसर्जन नमुंमपा व पोलीस यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करत सुव्यवस्थित रितीने पार पाडल्याबद्दल महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नागरिकांचे आभार मानले आहे. आता शनिवार दि. 23 सप्टेंबर 2023 रोजी श्रीगणेशमूर्तींसह होणारे जेष्ठागौरी विसर्जन लक्षात घेता विसर्जनस्थळी अधिक संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचे असल्याचे लक्षात घेऊन अधिक सक्षमतेने यंत्रणा सज्ज असणार आहे. नागरिकांनीही विसर्जन सोहळा शांततेत व सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे व इकोफ्रेंडली दृष्टिकोन जपत आपल्या घराजवळील कृत्रिम विसर्जन तलावांचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Published on : 25-09-2023 16:01:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update