‘माझी माती, माझा देश (Meri Maati Mera Desh)’ अभियानाकरिता नवी मुंबई महानगरपालिका सज्ज
स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या व वीर सैनिकांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “माझी माती माझा देश” (Meri Maati Mera Desh) हे देशव्यापी आणि लोकाभिमुख अभियान केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राबविले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही या राष्ट्रीय अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून याबाबत विशेष बैठक आयोजित करीत नमुंमपा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांनी अभियानांतर्गत राबवावयाच्या नियोजित कार्यक्रमाविषयी विचारविनीमय करीत आखणी केली व आयोजनविषयक कामाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या.
या बैठकीस “माझी माती माझा देश” अभियानाच्या नमुंमपा नोडल अधिकारी तथा क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त श्रीम. मंगला माळवे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उद्यान विभागाचे उपायुक्त श्री. दिलीप नेरकर, समाजविकास विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, शिक्षण विभागाचे उपायुक्त श्री. दत्तात्रय घनवट, कार्यकारी अभियंता श्री. अरविंद शिंदे उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत स्तरावर 9 ते 14 ऑगस्ट तसेच महापालिका स्तरावर 16 ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत “मेरी माटी मेरा देश” या अभियानांतर्गत ‘मिट्टी को नमन, वीरों को वंदन‘ या संकल्पनेनुसार विविध उपक्रम राबवायचे आहेत. यामध्ये शहीद आणि वीरांचा नामोल्लेख असलेला शीलाफलक बसवायचा आहे. तसेच विशेष कार्यक्रम आयोजित करून मातीचे दिवे अथवा माती हातात घेऊन पंचप्राण प्रतिज्ञा घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 75 देशी वृक्षारोपांची लागवड करीत अमृत वाटिका निर्माण करावयाची आहे. तसेच राष्ट्रध्वजारोहण व राष्ट्रगान करावयाचे आहे.
या सर्व उपक्रम आयोजनाबाबत तसेच त्यांच्या स्थळ, काळ निश्चितीबाबत या बैठकीत सविस्तर विचारविनीमय करण्यात आला व याविषयीची पाहणी करून त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले.
या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभागावर भर द्यावा. त्याकरिता बॅनर्स, होर्डिंग, सोशल मिडिया अशा सर्व माध्यमातून अभियानाला तसेच अभियानांतर्गत महानगरपालिका आयोजित करीत असलेल्या कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी द्यावी असेही आयुक्तांनी या बैठकीत निर्देशित केले. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये अभियानातर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले.
आपल्या मातृभूमीसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या वीरांप्रती आपल्या मनात असलेली अत्यंत आदराची व अभिमानाची भावना व्यक्त करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने “मेरी माटी, मेरा देश” या अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या सर्वच कार्यक्रमांत देशभिमानी नवी मुंबईकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केले आहे .
Published on : 02-08-2023 14:33:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update