15 ते 25 नोव्हेंबर कालावधीत “सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम”
कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचार कक्षेत आणणे व क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत “सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम” नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अतिजोखमीच्या भागात राबविण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही मोहीम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येत असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर याच्या मार्गदर्शनाखाली गठीत केलेल्या 95 पथकांच्या माध्यमातून 1,89,891 नागरिकांना भेटी देऊन तपासणी करण्यात येणार आहे तसेच जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येक पथक दररोज 40 ते 50 घरांना भेटी देऊन माहिती संकलीत करेल.
दोन आठवडयांपेक्षा जास्त कालावधीकरीता खोकला, दोन आठवडयांपेक्षा जास्त काळासाठी ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, छातीत दुखणे, मानेवरील गाठ अशा लक्षणांबाबत विचारणा करण्यात येणार आहे. यामध्ये क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास संबंधितांचे थुंकी नमुने आणि एक्स रे व्दारे व्दारे तपासणी करुन अंतिम निदान निश्चित करण्यात येणार आहे.
या मोहिमेमुळे क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा प्रशिक्षित पथकाव्दारे शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचाराच्या कक्षेत आणणे हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. सदर मोहिमेमध्ये नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास थुंकी नमुने देऊन उद्दीष्ट साध्य करण्यास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 12-11-2021 14:00:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update