16 जानेवारी पासून महिलांकरीता कर्करोग निदान शिबिरांचे विविध प्रभागांमध्ये आयोजन
सद्यस्थितीत कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून त्याकडे गांभिर्याने व काळजीपूर्वक पाहण्याची गरज आहे. कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियमित वाढीमुळे उद्भवणारा रोग असून कर्करोग शरिराच्या कोणत्याही पेशीमध्ये व अवयवामध्ये होऊ शकतो. याकडे विशेष लक्ष देत नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांकरीता महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हे शिबिर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभागनिहाय घेण्यात येणार असून प्रत्येक शिबिरामध्ये 100 महिलांची कर्करोगाच्या अनुषंगाने प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. महिलांमध्ये आढळलेल्या लक्षणांनुसार प्राधान्याने तपासणी करण्यात येणार आहे. या लक्षणांमध्ये -
मुख कर्करोगाच्या लक्षणात - दोन आठवडयांपेक्षा जास्त काळही न बरा होणारा व्रण / चांदा / जखम, तोंड उघडण्यास त्रास होणे, तोंडात लालसर पांढरा चट्टा. जेवण्यास / चावण्यास गिळण्यास त्रास होणे, जीभ हलविण्यास, बोलण्यास त्रास होणे, सतत तोंडाचा खराब वास येणे, तोंडात आकाराने वाढत जाणारी गाठ, जबडयात /जीभेत/ गालांत तीव्र वेदना, जीभेवर व ओठांवर बधिरपणा, आवाजात बदल होणे ही लक्षणे असतात.
गर्भाशय तोंडाचा कर्करोगाच्या लक्षणात - योनी मार्गातून मासिक पाळी बाह्य अनियमित रक्तस्त्राव होणे, रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्त्राव किंवा योनीमधून येणारा दुर्गंधीयुक्त रक्तमिश्रीत स्त्राव, शारीरिक संबंधाच्या वेळी किंवा नंतर होणारा रक्तस्त्राव अशी लक्षणे दिसून येतात.
स्तन कर्करोगाच्या लक्षणात - स्तनामध्ये किंवा काखेत गाठ येणे, सूज येणे, स्तनाच्या त्वचेवर डाग किंवा खड्डा पडणे, स्तनाग्र आत ओढले जाणे, स्तनात दुखणे, स्तनामधून पाणी किंवा रक्त वाहणे ही लक्षणे आढळतात.
अशाप्रकारे लक्षणे आढळलेल्या महिलांची या शिबिरात प्राधान्याने तपासणी करण्यात येणार आहे. 16 जानेवारी पासून 31 मार्च 2020 पर्यंत विविध प्रभागांमध्ये सकाळी 10 ते सायं 4.00 या वेळेत कर्करोग निदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
पहिल्या टप्प्यात 16 जानेवारी रोजी नागरी आरोग्य केंद्र, शिरवणे (प्र.क्र.81), नमुंमपा शाळा क्र. 46 गोठीवली गांव (प्र.क्र.24), समर्थ हेल्थ केअर, सेक्टर 19 ए नेरूळ (प्र.क्र.100), याठिकाणी शिबिर संपन्न होत आहे.
18 जानेवारी रोजी नागरी आरोग्य केंद्र दिघा (प्र.क्र.09), गणपतीपाडा दिघा (प्र.क्र.03), विष्णुनगर दिघा (प्र.क्र.04) येथे शिबिरे होणार आहेत.
25 जानेवारी रोजी तुर्भे गांव अंगणवाडी (प्र.क्र.72), आग्रोळी सेक्टर 29 समाजमंदीर (प्र.क्र.101), नागरी आरोग्य केंद्र नेरुळ फेज 1 (प्र.क्र.80) येथे शिबिर संपन्न होत आहे.
26 जानेवारी रोजी चंद्राबाई चौगुले शाळा चिंचपाडा ऐरोली (प्र.क्र.07) येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
27 जानेवारी रोजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांचा दवाखाना सेक्टर 4 सी.बी.डी. बेलापूर (प्र.क्र.104), नागरी आऱोग्य केंद्र करावे (प्र.क्र.110) व डॉ. डिसूजा क्लिनिक खैरणे (प्र.क्र.42) येथे शिबिरे होणार आहेत.
28 जानेवारी रोजी डॉ. काटकर क्लिनिक खैरणे (प्र.क्र.43), नागरी आरोग्य केंद्र नेरूळ फेज 1 (प्र.क्र.88) आणि ज्येष्ठ नागरिक भवन सेक्टर 11 नेरूळ (प्र.क्र.90) येथे कर्करोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
29 जानेवारी रोजी माता बाल रुग्णालय तुर्भे (प्र.क्र.66), तेरणा क्लिनिक तुर्भे स्टोअर (प्र.क्र.70) आणि नागरी आरोग्य केंद्र चिंचपाडा (प्र.क्र.08) येथे निदान शिबिर होत आहे.
31 जानेवारी रोजी रामनगर अंगणवाडी (प्र.क्र.02), प्रवोधनकार ठाकरे विद्यालय इलठनपाडा (प्र.क्र.05) व यादवनगर बुध्दविहार (प्र.क्र.06) याठिकाणी शिबिर होणार आहे.
नवी मुंबईच्या आरोग्यसंपन्नतेसाठी महानगरपालिका दक्ष असून समाजविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणा-या या महिलांकरिता विशेष कर्करोग निदान शिबिराचा लाभ या प्रकारची लक्षणे आढळणा-या महिलांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 15-01-2020 13:07:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update