16 केंद्रांतून 6 हजाराहून अधिक नागरिकांची अँटिजेन टेस्ट * केंद्रांच्या संख्येत दररोज वाढ करणार 27 जुलैपासून ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये स्पेशल अँटिजेन टेस्ट केंद्र सुरू होणार - आयुक्त श्री. अभिजीत बांगर
तपासणी, विलगीकरण आणि उपचार या त्रिसूत्रीच्या आधारावर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोरोना नियंत्रणासाठी 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेतले आहे. महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी तपासण्यांची संख्या वाढविण्याकडे आयुक्तांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आणि तातडीने पावले उचलत अर्ध्या तासात तपासणी अहवाल प्राप्त होणा-या अँटिजेन टेस्ट करण्यास त्वरित सुरूवात करून घेतली.
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या निकटच्या संपर्कात आलेल्या अथवा कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या प्रत्येकाची अँटीजेन टेस्ट करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांमार्फत सर्व आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले असून विभाग कार्यालयांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनाही यामध्ये लक्ष देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
16 जुलै रोजी सेक्टर 10 ए वाशी येथील महानगरपालिकेच्या सार्वजिनक डेडिकेटेड कोव्हीड रूग्णालायात रॅपीड अँटिजेन टेस्ट केंद्र सुरू करण्यात आले. पुढे प्रत्येक दिवसागणिक अँटिजेन टेस्ट केंद्राची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. आजमितीस 16 केंद्रांवर रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून 16 ते 25 जुलैपर्यंत 6144 व्यक्तींची अँटिजेन टेस्ट करण्यात आलेली आहे व त्यामधील 919 व्यक्तींचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेले आहेत. अशा पॉझिटिव्ह व्यक्तींचे त्वरित विलगीकरण करण्यात येऊन त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचीही अँटिजेन टेस्ट करून घेण्यात येत आहे. याशिवाय निगेटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या मात्र कोरोनासदृष्य लक्षणे आढळणा-या व्यक्तींची आर.टी.-पी.सी.आर.टेस्ट करून घेण्यात येत आहे.
सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली, बेलापूर व तुर्भे येथील 5 रुग्णालयांसोबतच इलठणपाडा दिघा, नोसिल नाका, घणसोली, वाशीगांव, जुहूगांव, कुकशेत अशा महानगरपालिकेच्या 6 नागरी आरोग्य केंद्रांमध्ये अँटिजेन टेस्ट सेंटर कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच सर्व 23 नागरी आरोग्य केंद्रात तत्परतेने सुरू करण्याची कार्यवाही आयुक्तांच्या निर्देशानुसार करण्यात येत आहे.
या 11 केंद्राप्रमाणेच डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय सेक्टर 5 नेरुळ, नानेश हॉस्पिटल सेक्टर 8 ए बेलापूर, जयराज हॉस्पिटल सेक्टर 4 बेलापूर, वे टू हेल्थ डायग्नोसिस सेंटर सेक्टर 42 सीवूड नेरूळ, एक्सेल लॅब सेक्टर 21 नेरूळ अशा 5 ठिकाणी अँटीजेन टेस्ट केल्या जात आहेत. अशाप्रकारे आजमितीस एकूण 16 केंद्रे सुरू आहेत.
सोमवार, 27 जुलैपासून ए.पी.एम.सी. मार्केटमध्येही सुरू होणार रॅपिड अँटिजेन टेस्ट सेंटर
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या ए.पी.एम.सी. मार्केटमधून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य, भाजीपाला, फळे आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात असल्याने ते संपूर्ण बंद ठेवणे शक्य नाही, मात्र तेथून कोरोनाची साखळी वाढू नये याकडे काळजीपूर्वक लक्ष देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये रॅपिड अँटिजेन टेस्ट सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सोमवार, 27 जुलैपासून हे सेंटर ए.पी.एम.सी. प्रशासनाच्या सहकार्याने कार्यान्वित होत आहे.
पोलीसांच्या आरोग्याची काळजी घेत 3 दिवसात 1852 पोलीसांची अँटिजेन टेस्ट
कोरोना विरोधातील या लढाईत कोरोना योध्दा म्हणून पोलीस अधिकारी व कर्मचारी अथक लढा देत असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पुढाकार घेत पोलीस आयुक्त श्री. संजय कुमार यांच्या सहकार्याने पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या अँटिजेन टेस्ट करण्यास सुरूवात केली. 3 दिवसात 1852 पोलीसांच्या टेस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये 74 जणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.
अत्यंत सुविधाजनक व 30 मिनिटांच्या कालावधीत अहवाल देणारी रॅपीड अँटिजेन टेस्ट त्वरित रूग्णशोधासाठी अत्यंत उपयोगाची असून महानगरपालिकेच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करुन घेण्यासाठी येणा-या प्रत्येक व्यक्तीची अँटीजेन टेस्ट करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिलेल्या आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात मोठया प्रमाणावर करण्यात येणा-या स्क्रिनींगमध्येही कोरोनाशी संबंधित लक्षणे आढळणा-या व्यक्तींची अँटीजेन टेस्ट करण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत. नागरिकांनी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 26-07-2020 16:19:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update