18 वर्षावरील नागरिकांसाठी इन्कोव्हॅक लसीचा कोविड प्रिकॉशन डोस
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोविड लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाचा इन्कोव्हॅक लसीचा समवेश करण्यात आला आहे. सदर लसीकरण एप्रिल 2023 पासून सुरु करण्यात आले होते. परंतु इन्कोव्हॅक लस ही 60 वर्षावरील नागरिक हे सहव्याधी असल्याने ते अतिजोखमीचे असल्यामुळे प्रथमतः प्रिकॉशन डोस म्हणून सुरु करण्यात आली होती.
तथापि सद्यस्थितीत सर्व वयोगटातील नागरिकांकडून प्रिकॉशन डोसबाबत मागणी असल्याने 18 वर्षावरील सर्व नागरिकांना इन्कोव्हॅक लस देण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2023 पासून 18 वर्षावरील नागरिकांना लसीकरणास सुरवात करण्यात आलेली आहे.
नाकावाटे दिली जाणारी ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस आहे. या लसीमुळे पेशींच्या रोगप्रतिकार क्षमतेत वाढ होणार असून थेट स्नायूमध्ये इंजेक्शन न देताच ही लस दिली जात असल्याने सुरक्षा देणारी आहे.
ही लस प्रिकॉशन डोस म्हणून दिली जात असून कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर 6 महिने पूर्ण झालेले लाभार्थी हे प्रिकॉशन डोसकरिता पात्र असतात. ही लस नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, नेरुळ व ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 यावेळेत उपलब्ध असणार आहे. हा डोस घेण्यासाठी दुसरा डोस घेतल्याचा पुरावा सोबत असणे आवश्यक आहे.
सदर लसीकरणासाठी पात्र नवी मुंबईकरांनी इन्कोव्हॅक लसीचा प्रिकॉशन डोस घ्यावा व कोविड आजारापासून संरक्षित व्हावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 03-11-2023 13:10:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update