24 व 25 जानेवारीला घुमणार नवी मुंबई महापौर चषक ब्रास बँड स्पर्धेचे सूर
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध क्रीडा व कला स्पर्धांच्या आयोजनातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे तसेच सांस्कृतिक स्पर्धांच्या माध्यमातून नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याचा सदैव प्रयत्न करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात परंपरागत वाद्यवृंद पथके (ब्रास बॅण्ड) मोठया प्रमाणात असून या पथकांनी ही कला आजपर्यंत अतिशय उत्साहाने जोपासलेली दिसून येत आहे. या ब्रास बॅण्ड पथकांना प्रोत्साहन देण्याकरीता मागील वर्षी पहिल्यांदाच महापौर चषकांतर्गत ब्रास बँड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला ब्रास बँड वादकांप्रमाणेच संगीतप्रेमी रसिकांचाही उदंड प्रतिसाद लाभला होता. याच धर्तीवर यावर्षीही दि. 24 व 25 जानेवारी 2020 रोजी, सायंकाळी नवी मुंबई महापौर चषक ब्रास बॅण्ड स्पर्धेचे आयोजन वंडर्स पार्क, से.19, नेरुळ, नवी मुंबई येथे करण्यात आले आहे.
ही स्पर्धा दोन गटात पार पडणार आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ब्रास बॅन्ड पथकांची स्पर्धा दि. 24 जानेवारी 2020 रोजी होणार असून मुंबई ठाणे व रायगड या क्षेत्रातील बॅन्ड पथकांच्या स्पर्धेचे आयोजन दि. 25 जानेवारी 2020 रोजी करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये एकुण 24 ब्रास बॅन्ड पथकांनी सहभाग नोंदविलेला आहे. या स्पर्धेत एकूण रु. 2 लक्ष 52 हजार इतक्या रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी दिलेली आहे.
या स्पर्धेकरीता नवी मुंबईसह नवी मुंबईलगतच्या शहरातील दर्जेदार ब्रास बॅण्ड पथकांना निमंत्रित करण्यात आलेले असल्याने नवी मुंबईतील संगीतप्रेमींना दर्जेदार संगीत ऐकण्याची पर्वणी मिळणार असून नवी मुंबईतील सर्व संगीतप्रेमी रसिक नागरिकांनी या कला अविष्काराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 22-01-2020 13:36:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update