270 हून अधिक कलावंत गाजविणार नवी मुंबई महापौर चषक नृत्य व गायन स्पर्धा
नवी मुंबई हे विविध विशेषणांनी नावाजले जाणारे शहर सांस्कृतिक शहर म्हणून नावारुपाला यावे या भूमिकेतून विविध प्रकारचे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उपक्रम नवी मुंबई महापौर चषक अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने हाती घेतले जात असून या प्रत्येक उपक्रमांना मिळणारा नागरिकांचा, त्यामध्ये विशेषत्वाने तरुणांचा व मुलांचा भरभरुन प्रतिसाद बघितला की नवी मुंबईत चांगले सांस्कृतिक वातावरण तयार होत असल्याचे समाधान वाटते अशा शब्दात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे उपसभापती श्री. गिरीष म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त् केले.
विष्णुदास भावे नाटयगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक नृत्य् व गायन स्पर्धा प्राथमिक फेरीच्या शुभारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त् करीत होते. या प्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त् श्री. नितीन काळे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, गायन स्पर्धेचे परीक्षक श्री. ऋग्वेद देशपांडे, नृत्य स्पर्धेच्या परीक्षक श्रीम.अंजली डावरे-बडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने चौथ्या वर्षी नवी मुंबई महापौर चषक् नृत्य व गायन स्पर्धा आयोजित केली जात असल्याची माहिती देत उपायुक्त् श्री. नितीन काळे यांनी यावर्षी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राप्रमाणेच शेजारील ठाणे व मुंबई जिल्हयांचाही समावेश स्पर्धेत केला असल्याचे सांगितले. यावर्षी स्पर्धेला अत्यंत उत्साही प्रतिसाद मिळालेला असून गायन स्पर्धेत 15 वर्षाखालील छोटया गटात 36 वैयक्तिक व 5 समूह त्याचप्रमाणे 15 वर्षावरील मोठया गटात 76 वैयक्तिक व 16 समूह अशा 130 गायक कलावंत व समूहांनी स्पर्धा सहभाग घेतला असल्याचे सांगितले. अशाच प्रकारे नृत्य स्पर्धेसही उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असून 15 वर्षाखालील छोटया गटात 44 वैयक्तिक व 29 समूह त्याचप्रमाणे 15 वर्षावरील मोठया गटात 43 वैयक्तिक व 25 समूह असे एकूण 141 वैयक्तिक आणि समूह नृत्य कलावंत आपले सादरीकरण करणार आहेत या सर्वांना त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेची महा अंतिम फेरी दि.12 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10.00 वा. पासून विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी येथे संपन्न होणार असून सायंकाळी 5.00 वाजता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थित संपन्न् होणार आहे. याप्रसंगी नामांकित सिने कलाकार उपस्थित राहणार असून कलाप्रेमी नवी मुंबई नागरिकांनी याप्रसंगी नृत्य व गायक कलावंतांना प्रोत्साहीत करण्यासाठी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 12-02-2019 17:00:23,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update