3 फेब्रुवारीला वाशीत नवी मुंबई महापौर चषक बालनाट्य स्पर्धा
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आरोग्य, शिक्षण, घनकचरा अशा दर्जेदार पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच शहरातील उद्योन्मुख व होतकरु कलाकांराना त्यांचे कलागुण सादर करणेकरीता हक्कांचे व्यासपीठ मिळावे याकरीता महापालिका सतत प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा व यामधून उद्याचे सक्षम कलाकार निर्माण व्हावेत याकरीता नवी मुंबई महापौर चषक बालनाट्य स्पर्धेचे आयोजन दि. 3 फेब्रुवारी 2020 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे करण्यात येत आहे.
या स्पर्धेची प्राथमिक फेऱी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे दि. 30 व 31 जानेवारी 2020 रोजी तालीम स्वरुपात होत असून यात 30 ते 45 मि. कालावधीच्या बालनाट्यांचे सादरीकरण होणार आहे. नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेमध्ये राज्यातील 11 जिल्ह्यांतून 35 बालनाट्ये सहभागी झालेली आहेत. त्यांची अंतिम फेरी दि. 3 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या बालनाट्यास रु. 25 हजार, व्दितीय क्रमांकाच्या बालनाट्यास रु.20 हजार, तृतीय क्रमांकाच्या बालनाट्यास रु.15 हजार इतकी पारितोषिक रक्कम प्रशस्तिपत्र व स्मृतीचिन्हासह देण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ दोन बालनाट्यांस प्रत्येकी रू. 5 हजार रक्कमेचे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लक्षवेधी बालनाट्यास रु.10 हजार इतकी बक्षिस रक्कम दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक स्वरुपात उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, रंगभूषा, अभिनेता, अभिनेत्री यांना प्रथम क्र. रु.1 हजार व प्रशस्तीपत्र आणि सन्मानपत्र, व्दितीय क्र. रु.750 आणि तृतीय क्र. रू. 400 इतकी बक्षिस रक्कम असून प्रमाणपत्र देऊन विजयी कलाकारांना गौरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा शाळा व हौशी संस्थाकरीता खुली असून सहभागी प्रत्येक नाटिकेस प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी सांगितले आहे.
तरी या स्पर्धेत सहभागी बालकलाकारांना प्रोत्साहित करणेकरीता नवी मुंबई नगरीतील कलाप्रेमी नागरीकांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीकरीता 3 फेब्रुवारी रोजी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी केले आहे.
Published on : 30-01-2020 12:23:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update