3 एप्रिलपासून ऐरोलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात विचारांचा ‘जागर’

ऐरोली सेक्टर 15 येथे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यतम स्मारक तेथील आगळ्यावेगळ्या सुविधांमुळे देशातील अत्त्युत्तम स्मारक असल्याचे अभिप्राय त्याठिकाणी भेटी देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींप्रमाणेच सामान्य नागरिकांकडूनही व्यक्त करण्यात आलेले आहे.
स्मारकातील बाबासाहेबांचा जीवनप्रवास दाखविणा-या अनेक दुर्मीळ छायाचित्रांचा संग्रह असणारे संग्रहालय, आभासी चित्रप्रणालीव्दारे (Holographic Presentation) बाबासाहेबांचे भाषण ऐकण्याचा सुवर्णयोग देणारा विशेष कक्ष, ध्यानकेंद्र अशा विविध नाविन्यपूर्ण सुविधांप्रमाणेच येथील आधुनिक 'ई लायब्ररी' सह असलेले समृध्द ग्रंथालय हा या स्मारकाचा आत्मा आहे.
‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार या स्मारकातून व्हावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने सुरूवातीपासूनच विविध मान्यवर व्यक्तींच्या व्याखानांचे आयोजन करीत याठिकाणी ज्ञानजागर करण्याचा वसा जोपासला आहे.
या अनुषंगाने मागील दीड वर्षात सातत्याने ‘विचारवेध’ या शिर्षकांतर्गत साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन याठिकाणी करण्यात येत आहे. त्या सोबतीनेच मागील वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे औचित्य साधून ‘जागर 2022’ ह्या मान्यवर व्यक्तींच्या विविध विषयांवरील व्याख्यानांच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन जयंतीपूर्वीच्या पंधरवड्यात करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांना श्रोत्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला होता.
‘जागर 2022’ ची हीच वैचारिक परंपरा कायम राखत यावर्षीही महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधत 'जागर २०२३' या व्याख्यान शृंखलेचे सायं. 6 वा. आयोजन करण्यात आलेले आहे.
या जागरामध्ये - सोमवार, दि. ३ एप्रिल रोजी एबीपी न्यूज आणि एबीपी माझा चे मुख्य संपादक श्री.राजीव खांडेकर यांचे ‘सर्वव्यापी आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
बुधवार, दि. ५ एप्रिल रोजी बीबीसी मराठी नवी दिल्लीचे मुख्य प्रतिनिधी व लेखक श्री.नामदेव काटकर (अंजना) हे माणसाच्या विकासातील वाचनाचे महत्व अधोरेखित करीत ‘वाचायचं कशासाठी?’ या विषयावर संवाद साधणार आहेत.
मंगळवार, दि. ११ एप्रिल रोजी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत डॉ.नरेंद्र जाधव हे ‘विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर : बहुआयामी प्रतिभावंत’ या विषयावरील व्याख्यानातून बाबासाहेबांच्या आभाळएवढ्या व्यक्तित्वातील विविधांगी पैलू उलगडणार आहेत.
गुरूवार, दि. १३ एप्रिल रोजी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजविणारे युवापिढीचे शिलेदार श्री.नीरज टकसांडे, श्री.आनंद माणिक इंगळे, श्री.प्रफुल्ल शशिकांत, श्री.प्रवीण निकम, श्री. अविनाश उषा वसंत हे 5 मान्यवर ‘भिमा तुझ्या जन्मामुळे…’ या शिर्षकांतर्गत उपस्थितांशी सुसंवाद साधणार आहेत.
याशिवाय ‘जागर २०२३’ अंतर्गत आणखी काही मान्यवरांच्या व्याख्यानांचे नियोजन सुरू असून त्यांच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
अशी विविध व्याख्यानपुष्पे गुंफत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिक आदरांजली अर्पण केली जाणार असून याप्रसंगी ज्ञानाचा जागर करण्यासाठी नागरिकांनी व त्यातही विशेषत्वाने युवकांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली- मुलुंड खाडी पुलाजवळ, सेक्टर १५, ऐरोली, नवी मुंबई येथे व्याख्यानांच्या दिवशी सायं. 6 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 03-04-2023 06:35:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update