31 डिसेंबरपूर्वी करावेत व्यवसाय परवाना नुतनीकरण अर्ज
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 376, अनुसूची “ड”, प्रकरण 18, भाग 4 मध्ये समाविष्ट असलेले सर्व व्यवसाय (उदा. खानावळी, उपहारगृहे, लॉजिंग बोर्डींग, स्वीट मार्ट, केक शॉप, आईस्क्रिम पार्लर, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर इत्यादी) यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 च्या अनुषंगाने देण्यात आलेल्या व्यवसाय परवान्यांचे नुतनीकरण दरवर्षी करण्यात येते.
नवी मुंबई महानगरपालिकेने नागरीकांना / व्यवसायिकांना परवाना देण्याची / त्यांचे नुतनीकरण करण्याची प्रक्रिया पारदर्शी व सुलभ करण्याकरीता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
कार्यालयीन कार्यप्रणालीनुसार व्यवसाय परवाना नुतनीकरण करणे अनिवार्य आहे. परवाना धारकास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 376, 392, 468 अन्वये विलंब शुल्क भरावे लागू नये याकरीता "व्यवसाय परवाना नुतनीकरण – 2021" साठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधितांनी www.rtsnmmconline.com किंवा महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) http:/www.nmmc.gov.in यावरील सुविधेचा वापर करून आपले ऑनलाईन (Online) अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2020 पूर्वी स्वत: सादर करावयाचे आहेत.
अर्जदाराने व्यवसाय परवाना नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित विभाग कार्यालयांकडून त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अनुसार ऑनलाईन (Online) पध्दतीने व्यवसाय परवान्यांच्या नुतनीकरणाची कार्यवाही करण्यात येईल.
नुतनीकरण न केलेल्या व्यवसायांवरील कारवाई टाळण्यासाठी व्यवसाय धारकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळाचा वापर करून विहित मुदतीत व्यवसाय परवान्यांचे नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 16-12-2020 14:39:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update