31 मार्चला महिलांच्या विशेष सहभागातून ‘स्वच्छता संग्राम रॅली’ व्दारे नवी मुंबईत स्वच्छतेचा जागर
स्वच्छतेमध्ये महिलांचा महत्वाची भूमिका असून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत लोकसहभागावर भर देताना त्यामध्ये महिलांच्या स्वच्छता कार्यातील सहभागावर विशेष लक्ष केंद्रीत करणारा "स्वच्छोत्सव-2023" ("Swachhotsav-2023”) हा अभिनव उपक्रम ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमाव्दारे महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे नेतृत्व वृध्दींगत करण्याचा उद्देश नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहे.
या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 31 मार्च रोजी ‘स्वच्छ भारत मिशन’ मार्फत सूचित करण्यात आल्यानुसार महिलांच्या विशेष सहभागावर भर देत ‘स्वच्छता संग्राम रॅली’ आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये सर्वसाधारण नागरिकांप्रमाणेच शालेय विद्यार्थिनी, महाविद्यालयीन युवती, महिला बचत गट व महिला संस्थांच्या प्रतिनिधी तसेच महिलांचा विशेष सहभाग असणार आहे.
शुक्रवार, दि. 31 मार्च 2023 रोजी, सायं. 5.30 वाजता, गणपतशेठ तांडेल मैदान, सेक्टर 26, नेरुळ येथून ही स्वच्छता संग्राम रॅली सुरु होणार असून यामध्ये सर्व नागरिक सहभागी होत असले तरी महिलांचा मोठ्या प्रमाणावर लक्षणीय सहभाग असणार आहे.
गणपतशेठ तांडेल मैदानापासून सुरु झालेली ही स्वच्छता संग्राम रॅली डी मार्ट समोरून सेक्टर 40, 42 मधील रस्त्यांनी सिवूड ग्रॅंड सेंट्रल मॉल मार्गे नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे जाणार असून यामध्ये कचरा वर्गीकरण, कच-याची विल्हेवाट, प्लास्टिक वापराला प्रतिबंध अशा स्वच्छताविषयक विविध संदेशांचे प्रसारण करण्यात येणार आहे.
नवी मुंबईकर नागरिकांमध्ये या महिलांच्या विशेष सहभागातून संपन्न होणा-या ‘स्वच्छता संग्राम रॅली’ व्दारे शहर स्वच्छतेविषयी व्यापक जनजागृती करण्यात येणार असून यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी त्यातही विशेषत्वाने मुली, युवती व महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने कऱण्यात येत आहे.
Published on : 29-03-2023 15:11:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update