4 नोव्हेंबरपर्यंत दाखल करू शकता 'स्वच्छता स्पर्धा' प्रवेश अर्ज
स्वच्छताविषयक चांगली कामगिरी करणा-या व्यक्ती, संस्था यांना प्रोत्साहित करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 6 गटांमधील 'स्वच्छता स्पर्धा' मध्ये सहभागाकरिता 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज दाखल करण्याचा कालावधी जाहीर करण्यात आला होता.
हा कालावधी वाढवावा अशी अनेक नागरिकांच्या वतीने विनंती करण्यात येत होती. त्यास अनुसरून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 4 नोव्हेबर 2020 पर्यंत अर्ज भरण्याच्या कालावधीत वाढ केलेली आहे.
त्यानुसार आता नागरिक आपल्या नजिकच्या विभाग कार्यालयात (1) स्वच्छ हॉटेल, (2) स्वच्छ शाळा (खाजगी व नमुंमपा), (3) स्वच्छ गृहनिर्माण संस्था / RWA, (4) स्वच्छ मार्केट असोसिएशन, (5) स्वच्छ शासकीय कार्यालय आणि (6) स्वच्छ हॉस्पिटल अशा सहा प्रमुख गटांमध्ये आयोजित स्वच्छता स्पर्धेतील सहभागाकरिता 4 नोव्हेबरपर्यंत अर्ज दाखल करू शकतात.
या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने कचरा वर्गीकरण (Source Segregation), कच-यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे, शौचालय व्यवस्था, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधा आणि कोव्हीड-19 आजाराचा प्रसार रोखण्याकरीता करण्यात आलेल्या उपाययोजना व नियमांचे पालन असे विविध निकष गुणांकनाकरिता असणार आहेत.
या स्वच्छता स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या संस्थांकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https:/www.nmmc.gov.in/navimumbai/swachh-survekshan-2021 या लिंकवर स्पर्धेचे निकष व अटींची माहिती प्रकाशित करण्यात आली असून त्यावर अर्ज नमुनाही उपलब्ध आहे. नागरिक या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून संबंधित विभाग कार्यालयात 4 नोव्हेबर 2020 पर्यंत दाखल करू शकतात.
नवी मुंबई शहरात लोकसहभागातून स्वच्छतेची चळवळ उभी रहावी हा नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न असून नागरिकांना प्रोत्साहन मिळावे याकरिता आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छता स्पर्धेमध्ये अधिक संख्येने सहभागी होता यावे याकरिता 4 नोव्हेबरपर्यंत प्रवेशअर्ज दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आलेली असून नागरिकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 29-10-2020 15:07:23,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update