5 वर्षाखालील 64999 नवी मुंबईतील मुलांनी घेतला पोलिओचा डोस
नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम महानगरपालिका क्षेत्रात प्रभावी रितीने राबविण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, महत्वाचे नाके अशा विविध ठिकाणी 600 स्थायी, 94 ट्रान्झिट व 28 फिरते मोबाईल असे एकूण 722 पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते. यामध्ये 64999 बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. म्हणजेच 73% अपेक्षित लाभार्थी मुलांचे लसीकरण झालेले आहे.
'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' - या घोषवाक्यास अनुसरून 5,34,661 घरांपर्यंत नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून पोलिओ लसीकरण मोहीमेची माहिती पोहचविण्यात आली. 874 पथकांव्दारे जनजागृती करण्यात आली. या शिवाय महानगरपालिका क्षेत्रात 723 बॅनर्स आणि 2936 पोस्टर्समधून व्यापक प्रमाणात माहिती प्रसारित करण्यात आली. साधारणत: 89445 इतके 5 वर्षाखालील लाभार्थी नजरेसमोर ठेवून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण बूथवरील 2 हजारहून अधिक कर्मचारी, स्वयंसेवक यांना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले होते तसेच कोव्हीड सुरक्षाविषयक बाबींचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने मुलांसह लसीकरणासाठी येणा-या नागरिकांनी परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखावे याची काळजी घेण्यात आली. मास्कचा वापर बुथवरील स्वयंसेवकांना अनिवार्य करण्यात आला होता. बालकाला लस पाजण्यापूर्वी व पाजल्यानंतर हात सॅनिटाईज करण्यात येत होते. लस देताना बालक पालकाकडेच असेल याची काळजी घेऊन बाळाला स्पर्श न करता तसेच ड्रॉपरचा स्पर्श बाळाच्या तोंडाला होणार नाही याची दक्षता घेऊन लस पाजण्यात आली. कोव्हीड सुरक्षा विषयक सर्वोतोपरी काळजी पोलिओ बूथवर घेण्यात आली.
तथापि काही कारणांमुळे ज्या संभाव्य लाभार्थी बालकांचे लसीकरण होऊ शकले नाही त्यांना दि. 20 जून ते 24 जून 2022 या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आपला भारत देश कायमस्वरूपी पोलिओमुक्त रहावा यादृष्टीने उप राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेस नवी मुंबईकर नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. मात्र ज्या बालकांना रविवारी बूथवर जाऊन डोस घेता आलेला नाही अशा बालकांसाठी विशेष मोहीम राबविली जात असून घरांना भेट देणा-या स्वयंसेवकांना आपल्या बालकांबाबत योग्य माहिती देऊन पोलिओ डोस पाजून घेण्याबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 20-06-2022 10:37:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update