8 फेब्रुवारीपासून महानगरपालिका करणार पूर्व स्वच्छता सर्वेक्षण (Pre Swachhata Survey) त्यापूर्वी आयुक्त श्री. अभिजीत बांगर घेणार विभागनिहाय स्वच्छतेचा आढावा विभाग कार्यालय पातळीवर स्वच्छ सर्वेक्षण कार्यवाहीसाठी वॉर्डनिहाय कर्मचारी पथके
स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशात प्रथम क्रमांकाचा निश्चय करीत त्यादिशेने वाटचाल करणारी नवी मुंबई महानगरपालिका सर्वेक्षणासाठी सज्ज होत असून वॉर्डनिहाय नियुक्त केलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या नोडल अधिका-यांनी स्वच्छ भारत मिशनमार्फत होणा-या प्रत्यक्ष सर्वेक्षणापूर्वी 8 फेब्रुवारीपासून 13 फेब्रुवारीपर्यंत पूर्व स्वच्छता सर्वेक्षण (प्री स्वच्छता सर्वे) करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. त्यादृष्टीने 7 फेब्रुवारी पर्यंत सद्यस्थितीत सर्वेक्षणाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांना वेग द्यावा असे आयुक्तांनी सूचित केले.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने अंतिम टप्प्यात करावयाच्या कार्यवाहीचा महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विशेष बैठकीत आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच नोडल अधिकारी, विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
नोडल अधिकारी यांचेमार्फत होणा-या पूर्व स्वच्छता सर्वेक्षणाआधी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान विभाग कार्यालयनिहाय प्रत्यक्ष आढावा बैठका घेणार असून त्यामध्ये विभागातील झालेल्या कामांची माहिती घेतली जाणार आहे व अपेक्षित कार्यवाही पूर्ण करण्याचे कालबध्द लक्ष्य दिले जाणार आहे.
सर्वेक्षणाच्या अनुषंगाने निर्मितीच्या ठिकाणी कच-याचे वर्गीकरण, कच-याचे संकलन आणि घरातच बास्केट वापरून कच-याची विल्हेवाट तसेच दररोज 50 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणा-या सोसायट्यांनी त्यांच्या आवारातच कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविणे यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. याकरिता विभाग कार्यालय पातळीवर वॉर्डनिहाय कर्मचा-यांची पथके नेमून त्यांच्याकडे आपापल्या प्रभागांतील स्वच्छता विषयक बाबींचे निरीक्षण व त्यामध्ये सुधारणा यांची जबाबदारी निश्चित करून द्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर होऊ नये याकरिता विभाग कार्यालयांमार्फत सुरु असलेल्या दंडात्मक कारवाया अधिक तीव्र करण्याच्या सूचना देत आयुक्तांनी प्लास्टिक दिसताच कामा नये यादृष्टीने काटेकोर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यासाठी मुख्यालय पातळीवरून प्लास्टिक प्रतिबंधावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष दक्षता पथक नेमण्यात येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
विभाग अधिका-यांनी कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी कचरा संकलन व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर नियोजन करावे तसेच घनकचरा नियमाचे उल्लंघन करीत कचरा वर्गीकरण न करणा-या सोसायट्यांना नोटीसा देऊन दंडात्मक कारवाई करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
गावठाण व झोपडपट्टी भागात नागरिकांनी कचरागाडी आल्यावरच त्यामध्ये कचरा द्यावा अशा सूचना नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात व त्याकरिता कचरा गाड्यांच्या फे-या वाढविण्याचे नियोजन करावे असेही घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्तांना सूचित करण्यात आले.
शहर सुशोभिकरणाची मोठी कामे 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देशित करतानाच गावठाण व झोपडपट्टी भागातील सुशोभिकरणावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना अभियांत्रिकी विभागाला देण्यात आल्या.
यापुढील काळात प्रत्येक अधिका-याने केवळ आपल्याला नेमून दिलेले कामच न बघता स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने सर्वच कामांवर लक्ष ठेवावे व एखाद्या कामात काही कमतरता जाणवल्यास ती संबंधीत विभाग प्रमुखांच्या निदर्शनास आणून द्यावी अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.
सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांच्या स्वच्छतेमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचित करतानाच शौचालये दिवसातून किती वेळा स्वच्छ केली यापेक्षा ती नियमित स्वच्छ राहतील व दिसतील याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदार व केअर टेकर यांना देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. प्रक्रीयाकृत सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सोसायट्या, बांधकाम व्यावसायिक यांना प्रोत्साहित करावे असेही आयुक्तांनी सूचित केले.
देशातील कचरामुक्त शहरांमध्ये फाईव्ह स्टार रेटींग मिळालेल्या 6 शहरांमध्ये महाराष्ट्रातील आपले एकमेव शहर असले तरी यावेळी आपण सेव्हन स्टार रेटींगचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवले असून हे उद्दीष्ट खूप कठीण आहे हे मान्य केले तरी योग्य दिशेने परिश्रम केले तर अशक्य नाही हे लक्षात ठेवूनच नियोजनबध्द काम करण्याचे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले.
Published on : 29-01-2021 05:40:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update