«Back

आकर्षक जनजागृती वाहन नवी मुंबईत करणार ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019’ चा प्रभावी प्रचार

आकर्षक जनजागृती वाहन नवी मुंबईत करणार ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019' चा प्रभावी प्रचार

      मागील वर्षी जनतेने हिरीरीने सहभाग घेत स्वच्छता अभियान यशस्वी केले व आपले नवी मुंबई शहर राज्यात पहिले व घनकचरा व्यवस्थापनात देशात पहिले मानांकित झाले. हे सातत्य टिकवून ठेवण्याची गरज असून स्वच्छता ही सर्वेक्षणापुरती मर्यादित न राहता ती आपली प्रत्येकाची दैनंदिन सवय व्हावी ही भूमिका नजरेसमोर ठेवून स्वच्छ सर्वेक्षण 2019 ला सामोरे जाताना नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आकर्षक स्वरुपात विशेष स्वच्छता वाहन तयार करण्यात आले असून नवी मुंबईच्या गल्लीगल्लीत शहर स्वच्छतेचा प्रचार व प्रसार करण्यात येईल व यातून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी अधिक जनजागृती केली जात असल्याचे नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी सांगितले.  

      ‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019' च्या अनुषंगाने जनतेमध्ये स्वच्छ व सुंदर शहराचा संदेश प्रसारित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘विशेष स्वच्छता जनजागृती वाहना'चा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोर महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समिती सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, फ प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. अनिता मानवतकर, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम. सुजाता पाटील, अतिरिक्त आयुक्त श्री. महावीर पेंढारी, नगरसेविका श्रीम. शुभांगी पाटील, श्रीम. उषा भोईर, श्रीम. तनुजा मढवी, श्रीम. जयश्री ठाकुर, श्रीम. रुपाली भगत, श्रीम. शशिकला पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, उपआयुक्त श्री. अमोल यादव, उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.

      याप्रसंगी बोलताना स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समितीच्या सभापती श्रीम. नेत्रा शिर्के यांनी स्वच्छते मध्ये नवी मुंबई सुरुवातीपासूनच अनेक पुरस्कारांना पात्र ठरलेली आहे. त्यामुळे पारितोषिक मिळविण्याच्या पुढे जात नवी मुंबई महानगरपालिका शहर स्वच्छतेचे काम करीतच आहे, त्यासोबतच माझे शहर कायमच स्वच्छ राहिले पाहिजे ही भूमिका नागरिकांच्या मनात निर्माण करण्याकडे विशेष लक्ष दिले जात असून याबाबतच्या लोकजागृतीकरीता तयार केलेले हे स्वच्छता वाहन नवी मुंबईच्या कानाकोप-यात स्वच्छता संदेश प्रसारित करेल असे सांगितले.

       नागरिकांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश रूजावा याकरिता सर्वच विभागात लोकसहभागातून स्वच्छताविषयक अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत व त्यामध्ये आबालवृध्द नागरिकांना सहभागी करून घेतले जात आहे. यामध्येच आता स्वच्छतेची माहिती प्रसारित करणा-या विशेष जनजागृती वाहनाची भर पडलेली असून आकर्षक रितीने सजविलेल्या या वाहनात मोठ्या आकाराची एल.ई.डी. स्क्रिन लावण्यात आलेली आहे. याव्दारे स्वच्छताविषयक जिंगल्स, जाहिराती, माहितीपट दाखविले जाणार आहेत.  त्याचप्रमाणे कलावंत पथक ठिकठिकाणी जाऊन स्वच्छताविषयक जाणीवजागृती करणारी मनोरंजक व प्रबोधनपर पथनाट्ये सादर करणार आहेत.

       नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे व आपल्याप्रमाणेच आपल्या शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यामध्येही स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी आग्रही असावे असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.