«Back

आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केली स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत स्वच्छता कामांची पाहणी

आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केली स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत स्वच्छता कामांची पाहणी

                   

        'स्वच्छ सर्वेक्षण 2019' मध्ये स्वच्छतेमधील मानांकन उंचाविण्यासाठी सर्व नागरिकांच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून लोकसहभागातून स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे. महापालिका आयु्क्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या अनुषंगाने आज विविध ठिकाणी भेटी देऊन शहर स्वच्छतेचा आढावा घेतला व ठिकठिकाणी मौलिक सूचना केल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्री. महावीर पेंढारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता श्री. सुभाष सोनवणे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, विभाग अधिकारी श्री. महेंद्रसिंग ठोके, स्वच्छता अधिकारी श्री. प्रल्हाद खोसे व श्री. राजेंद्र इंगळे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.  

      वाशी इनॉर्बिट मॉल, वाशी रेल्वे स्टेशन अशा वर्दळीच्या ठिकाणच्या परिसराची पाहणी करीत आयुक्तांनी रघुलिला मॉल समोरील पडीक जागेच्या स्वच्छतेविषयी सूचना दिल्या तसेच वाशी स्टेशन लगतच्या युरिनलच्या बांधकामाची पाहणी केली. वाशी गांव येथील नाखवा चौक व परिसराची पाहणी करताना त्याठिकाणी असलेला बसस्टॉप स्वच्छता व वापराविषयी निर्देश दिले. वाशीगाव सेक्टर 6 येथील तलाव तसेच सागर विहार परिसराच्या सफाईची पाहणी करताना त्यांनी सार्वजनिक शौचालयाचीही पाहणी केली. वाशी बसडेपो परिसर तसेच तेथील सार्वजनिक शौचालय, she टॉयलेट येथील नियमित वर्दळ लक्षात घेऊन त्याठिकाणी सफाईकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित केले. सेक्टर 17 वाशी येथील भाजी मंडई येथे अंतर्गत व बाह्य भागाची पाहणी करून आयुक्तांनी अंडरपासजवळ तसेच सायन पनवेल हायवेलगत स्वच्छतेच्या सूचना केल्या.

      नेरूळ विभागात सारसोळे, कुकशेत येथील परिसराची पाहणी करताना सारसोळे सेक्टर 12 बसडपो तसेच सेक्टर 15 भाजी मार्केट याठिकाणी बांधण्यात येत असलेल्या शौचालय संकुलाची पाहणी करून आयुक्तांनी गतिमानतेने काम पूर्ण करून नागरिकांना लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून देणेबाबत निर्देश दिले. सेक्टर 18 येथील तलावाची साफसफाई तसेच वंडर्स पार्क येथील कंपोस्ट पीटची पाहणी करून तेथील ग्रीन वेस्ट लगेचच नियमितपणे पीटमध्ये टाकणेची काळजी घ्यावी असे त्यांनी सूचित केले. आर.आर.पाटील उद्यानात पाहणी करताना योग्य ठिकाणी वृक्षारोपण करण्याच्या तसेच उद्यान स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शिवाजीनगर झोपडपट्टी भागात पाहणी करताना ओला व सुका कचरा वेगवेगळा देणेबाबत अधिक लक्ष देणेविषयी सूचित करतानाच त्याठिकाणी दिव्यांगासाठी बनविण्यात येणारे शौचालय बांधकाम लवकर पूर्ण करण्याविषयी त्यांनी निर्देशित केले.  

         ‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019' मध्ये आपले नवी मुंबई शहर मागील वर्षीपेक्षा अधिक स्वच्छ दिसावे व तसेच कायम रहावे याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे विशेष लक्ष असून लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिका हे मानांकन उंचावेल असा विश्वास प्रदर्शित करीत आयुक्त विभागवार स्वच्छताविषयक पाहणी करीत आहेत व स्वच्छताविषयक कामांना गती देत आहेत.