«Back

नवी मुंबईकर नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्यास प्राधान्य

नवी मुंबईकर नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्यास प्राधान्य

     नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवश्यक अशा विविध सुविधा पुरविण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे विशेष लक्ष असून नेरुळ विभागात सेक्टर 29 येथील सिडकोकडून पार्किंग प्लॉट म्हणून हस्तांतरीत झालेल्या भूखंड क्रमांक 10 वर वाहनतळ विकसित करण्यास आयुक्तांची मंजूरी प्राप्त झालेली आहे. सद्यस्थितीत हा भूखंड मोकळा असून त्यावर संरक्षक भिंत, रस्ते, गटारे असे बांधकाम करून त्याठिकाणी पार्किंग प्लॉट विकसित करण्यात येणार आहे. याव्दारे नागरिकांची वाहने उभे करण्याची चांगली सोय होऊन वाहतुकीचेही नियोजन होणार आहे.

      सेक्टर 8 नेरुळ येथील छत्रपती शाहु महाराज उद्यानात हिरवळ चांगल्या स्थितीत रहावी याकरीता सध्या पाईपव्दारे पाणी मारण्यात येते. त्याऐवजी त्याठिकाणी स्प्रिंकलर व्यवस्था करून पाण्याचा योग्य वापर करण्याचे नियोजन आहे. या कामामुळे पाण्याची व मनुष्यबळाची बचत होऊन उद्यानही व्यवस्थित राहण्यास मदत होणार आहे.

      सेक्टर 28 वाशी येथे भूखंड क्रमांक 191 याठिकाणी असलेल्या खेळाच्या मैदानात मुलांची मोठ्या प्रमाणावर नेहमीच गर्दी असते. मैदानाच्या बाजूस रहिवाशी क्षेत्र असल्याने मैदानात खेळल्या जाणा-या क्रिकेट, फुटबॉल आदी खेळांचे चेंडू सद्यस्थितीतील संरक्षक भिंतीची उंची कमी असल्याने पलिकडच्या रहिवाशी क्षेत्रात जाऊन नागरिकांना लागतो तसेच आसपासच्या घरात जाऊन त्याचा रहिवाशांना त्रास होतो. त्याचप्रमाणे मैदानातील सुकलेली माती उडून आसपासच्या घरांमध्ये जाऊन नागरिकांना धूळीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या जातात. त्याचप्रमाणे या मैदानात गटारे नसल्याने पावसाळी कालावधीत पाण्याचा निचरा न होता मैदानात पाणी साचून राहते व मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होत नाही. या सर्व गोष्टी विचारात घेऊन या खेळाच्या मैदानाभोवती उंच संरक्षक भिंत व पावसाळी गटार सुधारणा कामे हाती घेण्यास नागरिकांची आवश्यकता लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मंजूरी दिलेली आहे.

    अशाचप्रकारे सेक्टर 29 वाशी येथील राजीव गांधी उद्यानात असलेल्या खेळण्यांवर लहान मुलांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन 10 हजार 700 चौ.मी. क्षेत्रफळाच्या या उद्यानातील 880 चौ.मी. क्षेत्रात बसविलेल्या विविध खेळण्यांच्या क्षेत्रात मुलांना खेळताना लागू नये याकरीता अत्याधुनिक प्रकारचे सॅंड बेंडींग आयुक्तांच्या मान्यतेने पुरविण्यात येत आहे. याव्दारे खेळताना लहान मुलांची सुरक्षितता विचारात घेण्यात आली आहे.

      नेरुळ सेक्टर 19 ए येथे असलेले वंडर्स पार्क हे लहान थोरांचे आकर्षण केंद्र म्हणून नवी मुंबईसह आसपासच्या शहरांमधील नागरिकांचेही पर्यटनाचे आवडते ठिकाण आहे. वंडर्स पार्क जवळ मुंबई पुणे असा सायन पनवेल महामार्ग असल्याने जड, अवजड वाहने बहुतांशी वंडर्स पार्कच्या रस्त्याचा रहदारीसाठी वापर करताना दिसून येतात. त्याचप्रमाणे वाहतुक विभागामार्फतही एम.एस.ई.बी.च्या शेजारील भूखंडावर वाहन तपासणी केंद्र सुरु कऱण्यात आले असून अवजड वाहनांची या परिसरात वर्दळ वाढलेली आहे. आम्रमार्ग ते वंडर्स पार्क हा उताराचा रस्ता असल्याने त्याबाजुने अवजड वाहने वाहतुक झाल्यास अपघाताची शक्यता बळावते. वंडर्स पार्क मध्ये पालकांसह येणा-या मुलांचे प्रमाण मोठे असल्याने अपघाताची शक्यता टाळण्यासाठी आम्रमार्गावरून वंडर्स पार्क समोरील रस्त्याकडे जाणाच्या जंक्शनवर हाईट गेज बसविण्यास महापालिका आयुक्तांनी मंजूरी दिलेली आहे.

      शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांचा विचार करून शहरासाठी आवश्यक असलेल्या नागरी सुविधा पुरविण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. हे प्राधान्याने लक्ष देत आहेत.