«Back

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उत्साहात प्रारंभ

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उत्साहात प्रारंभ

 

             लहान वयातच मुलांच्या अंगभूत गुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर त्यांच्या मधील क्षमतांचा अंदाज त्यांना येतो व प्रोत्साहन मिळाल्यामुळे मुलांमधील गुण अधिक फुलतात. हाच उद्देश नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबई महापौर चषक बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील विविध ठिकाणच्या 28 बालनाट्य समुहांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल समूहांचे कौतुक करत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती श्री. मुनवर पटेल यांनी सर्व बालनाट्यकर्मींना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

             नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या उद्घाटन प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, परीक्षक श्री. किरण नाकती व श्री. गौरव मालंडकर, संयोजक श्री. राहुल इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

             या स्पर्धेमध्ये नवी मुंबईसह ठाणे, मुंबई, रायगड, अहमदनगर, नाशिक, पुणे अशा जिल्ह्यांतून 28 बालनाट्य समुहांनी सहभाग घेतला असून दि. 24, 25 व 26 डिसेंबर अशा तीन दिवसात होणा-या प्राथमिक फेरीतून 8 बालनाट्य समुहांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे. दि. 02 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9 वाजता अंतिम फेरीला विष्णुदास भावे नाट्यगृहात प्रारंभ होणार असून सायं. 6.30 वा. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते इतर मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

         बालनाट्याच्या माध्यमातून नवी मुंबई शहरात सांस्कृतिक चळवळ रुजविण्याचा नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न असून अंतिम फेरीतील बालनाट्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या मुलांसह पालकांनीही विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे 2 जानेवारी रोजी सकाळी 9 पासून आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.