«Back

नागरिकांना आवश्यक सुविधा कामांना प्राधान्य देण्याची आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भूमिका

नागरिकांना आवश्यक सुविधा कामांना प्राधान्य देण्याची आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भूमिका

     नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवश्यक असणा-या सुविधा कामांकडे सर्वांगीण लक्ष पुरविले जात असून 1 एप्रिल 2018 पासून आजतागायत  20 डिसेंबरपर्यंत 3624 सुविधा कामे झालेली व पूर्णत्वास येत असून 970 कोटींची रक्कमेची कामे सुरु असल्याची तसेच 304 कोटीहून अधिक रक्कमेची कामे आजच्या सर्वसाधारण सभेच्या पटलावर असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी डिसेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने सभागृहात दिली.

      यामध्ये 25 लक्षापेक्षा अधिक रक्कमेची 163 कामे, 5 ते 25 लक्ष रक्कमेपर्यंतची 310 कामे, 5 लक्ष पेक्षा कमी रक्कमेची 2646 कामे तसेच 2 लक्षपेक्षा कमी रक्कमेची 515 कामे असल्याचे सांगत प्रत्येक कामावर अत्याधुनिक संगणकीय प्रणालीव्दारे निरीक्षण व नियंत्रण ठेवले जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सर्वच नागरी सुविधा कामांच्या सद्यस्थितीचा नियमित आढावा घेतला जात असून त्यानुसार कार्यकारी अभियंता यांना वर्क रेटींग दिले जात असल्याचेही आयुक्त म्हणाले. या आढाव्यात काहीशी रेंगाळलेली कामे दिसून आल्यास त्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच नागरी सुविधांसाठी असलेल्या अर्थसंकल्पातील आर्थिक तरतूदी पेक्षा 322 कोटी रक्कमेची कामे नागरिकांची गरज व सुविधा कामांची आवश्यकता लक्षात घेऊन केली जात आहेत असे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सभागृहासमोर स्पष्ट केले.

      आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला तेव्हा घणसोली नोड हस्तांतरीत झाला होता व त्यानंतर घणसोली नोडमध्ये आवश्यक विविध सुविधा पुरविण्याचे सुरु केले असून त्याठिकाणी 159 कोटी इतक्या रक्कमेची कामे सुरु असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी 5 लक्ष रक्कमेपर्यंतची कामे विभाग पातळीवरच होत असून सर्व विभागातील कामांच्या प्रगतीकडे संगणकीय प्रणालीव्दारे लक्ष दिले जात असल्याचे सांगितले.

      अर्थसंकल्पातील तरतूदीचा विचार करून कामांचा प्राधान्यक्रम ठरवित नागरिकांना आवश्यक असणारी सर्व सुविधा कामे हाती घेण्यात येतील असे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सभागृहाला आश्वस्त केले.