«Back

पाहणी दौ-यात आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्या स्वच्छता कार्याला गती देण्याच्या सूचना

पाहणी दौ-यात आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्या स्वच्छता कार्याला गती देण्याच्या सूचना

    

         ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019'च्या अनुषंगाने सुरू असलेल्या स्वच्छताविषयक कामांचा विभागवार सकाळी भेटी देऊन प्रत्यक्ष आढावा घेण्यास महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सुरूवात केली असून कोपरखैरणे व ऐरोली भागातील महत्वाच्या ठिकाणांची त्यांनी शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार, परिमंडळ - 2 चे उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगेरे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. अमोल यादव, कार्यकारी अभियंता श्री. संजय देसाई, श्री. प्रवीण गाढे, श्री. गिरीश गुमास्ते, सहा. आयुक्त श्री. अशोक मढवी व श्रीम. प्रियांका काळसेकर, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे आणि संबंधित अधिकारी यांच्या समवेत पाहणी करीत स्वच्छता कामांना गती देण्याचे निर्देश दिले.

      कोपरखैरणे सेक्टर 10 येथे डि मार्ड जवळील वाणिज्य भागातील परिसर स्वच्छतेची पाहणी करीत त्यांनी नागरिकांची वर्दळ असणा-या अशा सर्वच वाणिज्य भागांमध्ये सकाळी व रात्री अशी दिवसातून दोन वेळा साफसफाई होत असलेल्या ठिकाणी अधिक बारकाईने सफाई करण्याचे निर्देश दिले.

         कोपरखैरणे सेक्टर 14 येथील निसर्गोद्यामध्ये भेट देत त्यांनी तेथे सकाळच्या वेळी जॉगींगसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असणा-या नागरिकांशी संवाद साधला व शहर स्वच्छतेविषयी त्यांची मते, सूचना जाणून घेतल्या. महानगरपालिका आपले स्वच्छतेचे काम करतेच आहे, त्यामध्ये नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि किमान ‘मी सार्वजनिक ठिकाणी कचरा करणार नाही, घरातला - दुकानातला कचरा ओला व सुका असा वेगवेगळा ठेवीन व महानगरपालिकेच्या कचरागाड्यांमध्ये वेगवेगळा देईन, सोसायटीच्या किवा वसाहतीच्या आवारातच ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेईन' अशा छोट्या छोट्या गोष्टींचा मनाशी निश्चय केला तरी नवी मुंबई स्वच्छतेत नेहमीच अग्रस्थानी राहील असे आयुक्तांनी सांगत नागरिकांना आपल्या शहरासाठी संपूर्ण योगदान देण्याचे आवाहन केले. निसर्गोद्यानामध्ये होत असलेल्या स्वच्छता पार्कमध्ये नागरिकांना आपल्या आवारात खत प्रकल्प राबवावयाचा असल्यास त्यासाठी उपलब्ध असणारे विविध पर्यायांची प्रात्यक्षिकासह माहिती त्याठिकाणी उपलब्ध असण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकारी यांनी दिल्या. पुढे सेक्टर 19 येथील धारण तलावास भेट देत त्याठिकाणी नागरिकांची नेहमीच गर्दी असते हे लक्षात घेऊन लिटर बिन्स संख्या वाढविण्याचे आयुक्तांनी सूचित केले.

         ऐरोली सेक्टर 5 येथील चिंचोली उद्यान अर्थात झेन गार्डन याठिकाणी कम्पोस्ट पीट्सची पाहणी करीत उद्यानातील सर्व हरित कचरा पीट्समध्ये नियमित टाकला जाईल याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले तसेच त्या समोरील हायटेन्शन खालील मोकळ्या पडीक जागेची साफसफाई करण्याच्या सूचनाही शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने त्यांनी दिल्या. तेथील शौचालयाची पाहणी करीत स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे त्यांनी निर्देशित केले. दिवागाव तलावाला भेट देऊन तेथील परिसराची पाहणी करताना त्याठिकाणी तलावात कपडे धुवू नयेत व इतर अनुषांगिक सूचनांचे फलकांमध्ये वाढ करावी तसेच निर्माल्य कलश दर्शनी भागात ठेवावा अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

        या पाहणी दौ-यात आयुक्तांनी विविध ठिकाणी शौचालयांतील स्वच्छतेची तसेच सेक्टर 14 येथे त्याचप्रमाणे पटणी रोडवर नागरिकांच्या मागणीनुसार बांधण्यात आलेल्या मुतारींची पाहणी केली. तेथील स्वच्छता नियमित रहावी याकडे काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना करतानाच त्याठिकाणी दिव्यांगांसाठी रॅम्प बांधणेबाबतही आयुक्तांनी सूचित केले.

        सकाळी 7 वाजल्यापासून विविध विभागांत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी संबंधित अधिका-यांसमवेत स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करण्यास सुरूवात केली असून याव्दारे महापालिका अधिकारी – कर्मचारीवृंदाप्रमाणेच नागरिकांमध्येही स्वच्छतेविषयी जागरूकता वाढत असल्याचे चित्र अनुभवण्यास मिळत आहे.

 

      स्वच्छता व देखभालीकडे दुर्लक्ष करणा-या कंत्राटदारास 5 लक्ष रक्कमेचा दंड

      25 डिसेंबरच्या स्वच्छताविषयक प्रत्यक्ष पाहणी दौ-यात महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांना नेरूळ सेक्टर 19 ए येथील वंडर्स पार्क मध्ये सार्वजनिक शौचालयात फ्लोअरींग नादुरूस्त असल्याचे तसेच शौचालायात लिक्विड सोप नसून स्वच्छतेकडे नीट लक्ष नसल्याचे निदर्शनास आले असता सदर कंत्राटदार मे. अश्विनी इन्फ्रा डेव्हलपमेंट यांच्यावर सर्वसमावेशक देखभाल व दुरूस्ती कंत्राटातील निष्काळजीपणापोटी रू. 5 लक्ष रक्कमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.