«Back

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने पाहणी

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने पाहणी

    

                नवी मुंबई शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या अनुषंगाने स्वच्छताविषयक कामांना गती देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त्‍ डॉ. रामास्वामी एन. यांनी विविध विभागांना प्रत्यक्ष भेटी देत स्वच्छतेची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. ख्रिसमसच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही आयुक्तांनी बेलापूर व नेरुळ विभागात संबंधित अधिकाऱ्यांसह स्वच्छता विषयक कामांची पाहणी केली असून आज सकाळी 7 वाजल्यापासून कार्यालयीन वेळेपर्यंत त्यांनी तुर्भे व वाशी विभागाचा पाहणी दौरा केला. याप्रसंगी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त (सेवा) श्री. महावीर पेंढारी, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार, परिमंडळ -1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन काळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            सायन-पनवेल हायवेवर तुर्भे उड्डाणपूल याठिकाणी सुरु असलेल्या सुशोभिकरण तसेच रंगरंगोटी व स्वच्छता संदेश प्रसारण कामाची पाहणी करत आयुक्तांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसेच त्या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलीसांच्या चौकीजवळील डेब्रिज पडलेल्या मोकळया जागेची साफसफाई केल्यानंतरच्या कामाची पाहणी केली. त्या ठिकाणी लाल माती टाकून सुशोभिकरण करण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले.

             सानपाडा पोलीस स्टेशन मागील खोकड तलाव भागाची पाहणी करताना तलाव व परिसर सफाई करण्याबरोबरच त्या ठिकाणी अजून निर्माल्य्‍ कलश ठेवण्यात यावेत व परिसराचे सुशोभिकरण करावे असे सूचित केले.

            ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील अमृत योजनेच्या हरित पट्टयाची पाहणीही त्यांनी केली तसेच त्या ठिकाणी तयार करण्यात येत असलेल्या स्मृतीवन या अभिनव संकल्पनेच्या कामालाही गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहराच्या पर्यावरण संरंक्षण - संवर्धनात नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग असावा यादृष्टीने नागरिकांच्या प्रियजनांचे वाढदिवस, स्मृतीदिन, विशेष दिवस अशा महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना वृक्षरोपांच्या माध्य्‍मातून स्मृती जतन करण्यासाठी ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी जागा उपलब्ध्‍ करुन देण्यात आलेली आहे.

          सानपाडा येथील सीताराम मास्तर उदयान येथील स्वच्छता व इतर कामांची पाहणी करताना त्यांनी त्या ठिकाणचा पदपथ दुरुस्ती करण्याबाबत निर्देश दिले तसेच रंगरंगोटी करताना सामाजिक संदेश प्रसारीत करण्याच्या सूचना केल्या. सानपाडा मार्केट येथे पाहणी करत असताना आयुक्तांनी त्या ठिकाणी वापरात असलेल्या कंपोस्टिंग पीट मध्ये मार्केटमधील सर्व हरित कचरा टाकला जाईल याकडे बारकाईने लक्ष देण्याबाबत सूचित केले.

           ओडीएफ डबल प्लस मानांकनाच्या दृष्टीने नवी मुंबईची प्रतिमा कायम रहावी याकरीता शौचालय संकुलांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याबाबत आयुक्तांनी सूचना केल्या. त्याअनुषंगाने एपीएमसी मार्केट तुर्भे परिसर व तुर्भे स्टोअर येथील शौचालय संकुलांना भेटी दिल्या.

         शौचालय संकुलांची नियमीत देखभाल व दुरुस्ती व्यवस्थित व्हावी यादृष्टीने सर्व शौचालयांची एकत्रित निविदा काढण्यात आली असून त्यामुळे शौचालयांची स्थिती व स्वच्छता चांगली राहील असे आयुक्तांनी स्पष्ट केले. स्वच्छ सर्वेक्षण – 2019 च्या अनुषंगाने नवी मुंबई शहर आपले मानांकन उंचावण्यासाठी सज्ज्‍ असून नवी मुंबईकर नागरिक यामध्ये नेहमीप्रमाणेच आपला महत्त्वाचा वाटा उचलतील असा विश्वास महापलिका आयुक्त्‍ डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केला आहे.