«Back

महापालिका सर्वसाधारण सभेत 5 गुणवंत खेळाडूंचा सन्मान

महापालिका सर्वसाधारण सभेत 5 गुणवंत खेळाडूंचा सन्मान

      नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते, क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून नवी मुंबईचा नावलौकीक उंचाविणा-या गुणवंतांचा उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, विरोधी पक्षनेता श्री. विजय चौगुले, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती श्री. मुनवर पटेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षप्रतोद श्री. अविनाश लाड, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्री. सुनिल पाटील यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

     "स्विमींग फेडरेशन ऑफ इंडिया" आयोजित विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे संपन्न झालेल्या पंधराव्या मास्टर्स ॲक्वाटिक चॅम्पियनशीप 2018 जलतरण स्पर्धेमध्ये 50 मी. बटरफ्लाय, 4 x 50 फ्री स्टाईल रिले आणि 1 मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हींग या जलतरण प्रकारात 3 सुवर्णपदके, 50 मी. बॅकस्ट्रोक व 100 मी. बटरफ्लाय या  जलतरण प्रकारात 2 रौप्यपदके तसेच 200 मी. वैयक्तिक मेडले आणि 4 x 50 मी. मेडले रिले  जलतरण प्रकारात 2 कांस्य पदके अशी एकूण 7 पदके संपादन करणा-या जलतरणपट्टू श्रीम. रश्मी विजयेन्द्र सब्बनवार,

       त्याचप्रमाणे "स्विमींग फेडरेशन ऑफ इंडिया" आयोजित वेंगुर्ला, सिंधुदूर्ग येथे संपन्न झालेल्या पहिल्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेमध्ये 1 कि.मी. अंतर 7 मि. 50 से. इतक्या कमी वेळेत पार करून सुवर्ण पदक संपादन करणा-या कु. मंत्रा मंगेश कुरेया जलतरणपट्टूस,

       तसेच 11 स्पोर्टस् आणि मध्य प्रदेश टेबल टेनिस असोसिएशन आयोजित टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने संपन्न झालेल्या '11 स्पोर्टस् आंतरशालेय टेबल टेनिस नॅशनल चॅम्पियनशीप 2018' मध्ये वरिष्ठ मुलींच्या वैयक्तिक गटात सुवर्ण पदक संपादन करणारी टेबल टेनिस खेळाडू  कु. तेजल जयंत कांबळेया नवी मुंबई महानगरपालिकेचे उप अभियंता श्री. जयंत कांबळे यांच्या कन्येस,

       आणि "स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया" आयोजित बडौदा, गुजरात येथे संपन्न झालेल्या ‘63 वी राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा 2017-18' या मध्ये 19 वर्षाखालील मुलींच्या गटात सुवर्ण पदक संपादन करणा-या कु. श्रेया शिरीष देशपांडेया क्रीडापट्टूस,

तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 6, करावे येथील महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यी कु. आर्यन संतोष सोनोनेया सुवर्ण पदक संपादन करणा-या खेळाडूस,

      अशाचप्रकारे  नवी मुंबई शहराचा नावलौकीक राष्ट्रीय पातळीवर उंचावणा-या 4 खेळाडूंना व राज्य पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणा-या महानगरपालिका शाळेतील एका खेळाडूला सर्वसाधारण सभागृहाच्या वतीने त्यांच्या उज्वल यशाबद्दल अभिनंदनपर सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.