«Back

वाहनचालकांसाठी माहितीपूर्ण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

वाहनचालकांसाठी माहितीपूर्ण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

     प्रत्येक गोष्टी सातत्याने बदलतात त्यामुळे नवनव्या गोष्टींचे प्रशिक्षण घेतल्यास चांगल्या गोष्टींची उजळणी होऊन आपल्या कौशल्यात वाढ होत असते. वाहनात बसणारे पदाधिकारी, अधिकारी यांचे जीवन वाहनचालकावर अवलंबून असते व त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवूनच कोणताही प्रवास केला जातो. त्यामुळे वाहनचालक हे अत्यंत जबाबदारीचे व महत्वाचे पद असून प्रशिक्षणामुळे वाहनचालकांच्या कार्यपध्दतीत आणखी चांगला बदल होईल असा विश्वास अतिरिक्त आयुक्त शहर श्री. रविंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

      नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाहनचालकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन आणि कार्यनिती वृद्धींगत होण्यासाठी भारत सरकारच्या पेट्रोलीयम संरक्षण अनुसंधान संघ तसेच पेट्रोलियम आणि प्राकृतीक गॅस मंत्रालय यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाहनचालकांसाठी आयोजित विशेष कार्यशाळेप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.

      यावेळी अतिरिक्त आयुक्त शहर श्री. रविंद्र पाटील यांच्या समवेत वाहन विभागाचे उप आयुक्त श्री. नितीन काळे, पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघाचे पश्चिम विभागीय अतिरिक्त संचालक श्री. संदीप पाध्ये व श्री. समीर गुप्ता आणि व्याख्याते श्री. एस.आर. ठोंबरे मंचावर उपस्थित होते.

      यावेळी बोलताना वाहन विभागाचे उप आयुक्त श्री. नितिन काळे यांनी युरोपीयन देशात ड्रायव्हरला कॅप्टन म्हणतात असे सांगत वाहनचालकांचे महत्व अधोरेखित केले. वाहन चालविणे ही एक कला असून सुरक्षित वाहन चालविण्यासोबतच कर्तव्य व जबाबदा-या यादेखील जाणून घेऊन आपले काम करावे असे आवाहन त्यांनी केले. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या संकल्पनेनुसार महानगरपालिकेचा प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आपापल्या कामात अद्ययावत असावा या भूमिकेतून वाहनचालकांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

      नवी मुंबई महानगरपालिका वाहनचालकांच्या सकारात्मक दृष्टीकोनात वाढ, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ तसेच वाहनाची हाताळणी, इंधन बचत यामधून खर्चाची बचत अशा विविध गोष्टींवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाहनचालकांनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेला उपस्थित राहून तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.