सभापती श्रीम. नेत्रा शिर्के यांनी स्वच्छतेचा आढावा घेत साधला नागरिकांशी सुसंवाद
सभापती श्रीम. नेत्रा शिर्के यांनी स्वच्छतेचा आढावा घेत साधला नागरिकांशी सुसंवाद
स्वच्छतेविषयी अतिशय जागरूक असणा-या नवी मुंबईकर नागरिकांचा स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये प्रत्यक्ष सहभाग वाढावा यादृष्टीने महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागांत स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये लोकसहभागाला प्राधान्य देण्यात येत आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समितीच्या सभापती श्रीम. नेत्रा शिर्के यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार यांच्यासह विविध ठिकाणी भेटी देऊन स्वच्छताविषयक कामांची पाहणी केली तसेच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांना स्वच्छता मोहिमेमधील सक्रीय सहभागाबाबत आवाहन केले.
कोपरखैरणे विभागात सेक्टर 1 व 4 येथील कंडोमिनियम भागात भेट देऊन त्यांनी स्वच्छतेची पाहणी केली व ओला आणि सुका कचरा घरातच वेगवेगळा ठेवून महानगरपालिकेच्या कचरा गाडीतही वेगवेगळा देण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन केले. सद्यस्थितीत ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या अनुषंगाने विशेषत्वाने गाव - गावठाण व झोपडपट्टी भागात नागरिकांमध्ये विशेष जागरुकता आणण्याची आवश्यकता लक्षात घेऊन या गोष्टीकडे अधिक लक्ष देण्याबाबत सर्वांनीच सामुहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सभापती श्रीम. नेत्रा शिर्के यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांच्या समवेत आरोग्य समितीच्या सभापती श्रीम. वैशाली नाईक, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. लता मढवी, नगरसेविका श्रीम. सायली शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उप आयुक्त श्री. तुषार पवार, कोपरखैरणे विभाग सहा. आयुक्त श्री. अशोक मढवी, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे आणि इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या अनुषंगाने समस्त लोकप्रतिनिधी प्रभागातील नवी मुंबईकर नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमात पुढाकार घेत असून नागरिकांनी स्वच्छता ही दैनंदिन आणि नियमित सवय म्हणून अंगीकारून आपले नवी मुंबई शहर स्वच्छ सुंदर व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी संपुर्ण योगदान द्यावे असे आवाहन दौ-यामध्ये नागरिकांशी संवाद साधताना स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समितीच्या सभापती श्रीम. नेत्रा शिर्के यांनी केले आहे.