«Back

3 ते 5 जानेवारीला होणार नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा 5 जानेवारीला प्रकाशझोतात रंगणार डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये उपान्त्य व अंतिम फेरी

3 ते 5 जानेवारीला होणार नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा 5 जानेवारीला प्रकाशझोतात रंगणार डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये उपान्त्य व अंतिम फेरी

 

          नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषकांतर्गत विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करुन खेळाडूंना व कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. याच अनुषंगाने वयाच्या चाळीशीनंतर आपला शारीरिक फिटनेस टिकून रहावा याकरिता भारतातील सर्वात लोकप्रिय अशा क्रिकेट खेळाच्या माध्यमातून नवी मुंबईत एक वेगळे चैतन्यपूर्ण वातावरण दिसून येते.

           आज राज्यभरात लोकप्रिय असणा-या फोर्टी प्लस क्रिकेट संकल्पनेचा उदय नवी मुंबईतूनच झालेला दिसून येतो. म्हणूनच शहरातील चाळीशीपुढील खेळाडूंना त्यांच्या आरोग्यपूर्ण जागरूकतेसाठी प्रोत्साहन मिळावे व त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून शारीरिकदृष्ट्या तंदूरुस्त रहावे या उद्देशाने प्रतिवर्षीप्रमाणेच याही वर्षी 'नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा' दि. 03 ते 05 जानेवारी 2019 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

          या स्पर्धेमध्ये 40 वर्षावरील वयोगटाचे नवी मुंबईतील 30 गावांतील 33 संघ तसेच शहरी भागातील 15 संघ सहभागी होणार आहेत. 40 प्लस क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामने दि. 03 व 04 जानेवारी 2019 रोजी नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशन, वाशी, सेक्टर-1 ए येथील मैदानावर आयोजित करण्यात आले असून दि. 05 जानेवारी 2019 रोजी डॉ.डी.वाय पाटील स्टेडियम,नेरुळ येथे प्रकाश झोतात उपांत्य फेरी व अंतिम फेरीचे सामने होणार आहेत.

           नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते या फोर्टी प्लस महापौर चषक क्रिकेट स्पर्धेतील विजयी व उपविजयी संघास आकर्षक चषक तसेच इतर वैयक्तिक कामगिरीनिहाय खेळाडूंना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार असल्याची माहिती देत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री.मुनवर पटेल, यांनी स्पर्धेतील संघाना प्रोत्साहन देणेकरीता नवी मुंबईतील क्रीडाप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने मैदानात उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवावी असे आवाहन केले आहे.