महापालिका व पोलीस यांची ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये कोव्हीड प्रतिबंधात्मक धडक कारवाई, तुर्भे विभागामार्फत प्लास्टिक विरोधातील मोठी कारवाई - 950 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त
![WhatsApp Image 2021-03-03 at 11_53_03 AM.jpeg WhatsApp Image 2021-03-03 at 11_53_03 AM.jpeg](https://nmmc.gov.in/navimumbai/assets/251/2021/03/mediafiles/WhatsApp_Image_2021-03-03_at_11_53_03_AM.jpeg)
कोव्हीड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कडक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ए.पी.एम.सी. मार्केट या कोव्हीड प्रसाराच्या दृष्टीने सर्वाधिक जोखमीच्या ठिकाणी अचानक भेट देत प्रभावी कारवाईचे निर्देश दिले होते. याबाबत पोलीस आयुक्त श्री. बिपीन कुमार सिंह यांच्याशीही चर्चा केली होती.
त्यानुसार ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त श्री. सुरेश मेंगडे यांच्या नियंत्रणाखाली महापालिका व पोलीस अशी धडक कारवाई करत मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न राखणे अशाप्रकारे सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या 144 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
यामध्ये मास्क न वापरणा-या 51 जणांकडून प्रत्येकी 500/- रुपये प्रमाणे रु. 25 हजार 500 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सुरक्षित अंतर न राखणा-या 83 व्यक्तींकडून प्रत्येकी 200/- रुपये प्रमाणे रु.16 हजार 600 तसेच 9 आस्थापनांकडून प्रत्येकी रु. 2000/- प्रमाणे रु.18 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे याकरिता एका व्यक्तीकडून रुपये 1 हजार इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. अशाप्रकारे ए.पी.एम.सी. मार्केटमधील पोलीस व महापालिका यांच्या धडक मोहिमेतून रुपये 61 हजार 100 इतक्या दंडात्मक रक्कमेची वसूली करण्यात आलेली आहे. या मोहिमेमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. विनायक वस्त तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. सुबोध ठाणेकर आणि इतर पोलीस व महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, सतत हात धुणे अथवा सॅनिटायजर वापरणे या कोव्हीड 19 सुरक्षा नियमांचे पालन करणे हे त्यांच्या स्वत:च्या व त्यांच्या संपर्कात येणा-या नागरिकांच्या आरोग्यासाठी हिताचे असून कोरोना विषाणू विरोधातील हे प्रभावी अस्त्र आहे. त्यामुळे सुरक्षा नियमांचे पालन न करून इतरांच्या आरोग्याला धोका पोहचविणा-या व्यक्तींना समज मिळावी याकरिता हा कारवाईचा बडगा यापुढे सतत उगारला जाणार असून नागरिकांनी कारवाईला सामोरे न जाण्यासाठी व स्वत:चे आणि इतराचे आरोग्य जपण्यासाठी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
तुर्भे विभागामार्फत प्लास्टिक विरोधातील मोठी कारवाई - 950 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विशेष बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार सर्वच विभागांमध्ये प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई तीव्र करण्यात आली असून तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील ए.पी.एम.सी. भाजी मार्केटमध्ये विभाग कार्यालयाच्या पोलीस व महापालिका अशा संयुक्त दक्षता पथकाव्दारे त्याठिकाणी प्लास्टिक विक्री व वापर करणा-या व्यावसायिकांकडून रुपये 30 हजार रक्कमेची दंडात्मक वसुली करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या धडक मोहिमेमध्ये 950 किलोहून अधिक प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्याकरिता महापालिका सतर्क झाली असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी जनजागृतीप्रमाणेच प्रभावी कारवायाही करण्यात येत आहेत.
Published on : 04-03-2021 12:45:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update