*वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर उपचारासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची 12 हजार बेड्सची सज्जता*
जानेवारी महिन्याच्या सुरूवातीपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुस-या लाटेतील अनुभव लक्षात घेऊन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेने आधीपासूनच तिस-या लाटेची पूर्वतयारी सुरू केली होती. त्यानुसार कोव्हीड केंद्रातील सर्वसाधारण, ऑक्सिजन बेड्सप्रमाणेच विशेषत्वाने दुस-या लाटेत कमतरता जाणवलेल्या आयसीयू व व्हेन्टिलेटर्स वाढीकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे.
दुस-या लाटेचा प्रभाव कमी होऊ लागल्यानंतर रुग्णसंख्येत होणारी घट लक्षात घेऊन काही कोव्हीड केंद्रे तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली होती. त्यामध्ये सिडको एक्झिबिशन कोव्हीड सेंटर तसेच एमजीएम रूग्णालय सानपाडा कोव्हीड सेंटर आणि सिडको कोव्हीड सेंटरमधील आयसीयू सुविधा कार्यान्वित होती. तथापि रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली इतर केंद्रेही एकेक करून कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. यामध्ये राधास्वामी आश्रम तुर्भे येथे 358 ऑक्सिजन बेड्स तसेच एक्सोर्ट हाऊस तुर्भे येथे 492 ऑक्सिजन बेड्सची दोन्ही डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर्स पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आलेली आहेत.
त्याचप्रमाणे सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथे 503 ऑक्सिजन बेड्स क्षमतेचे नवीन मयुरेश कोव्हीड सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच जी डी पोळ रुग्णालय खारघर येथे 450 बेड्स क्षमतेचे नवीन कोव्हीड सेंटरही कार्यान्वित करण्यात आलेले आहे.
याशिवाय वाशी सेक्टर 30 येथील तात्पुरते बंद करण्यात आलेले 200 बेड्स क्षमतेचे इटीसी कोव्हीड सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात आले असून ते महिला कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. तसेच नेरुळ सेक्टर 9 येथील समाज मंदिरातील 60 बेड्स क्षमतेचे कोव्हीड सेंटरही पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे.
याशिवाय माता बाल रुग्णालय बेलापूर हे कोव्हीड बाधित महिलांच्या प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात उपचारांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. रुग्ण गंभीरतेचे प्रमाण सद्यस्थितीत कमी असले तरी नवी मुंबई महानगरपालिकेने सिडको कोव्हीड सेंटरमध्ये निर्माण केलेला 75 आयसीयू बेड्स व 32 व्हेन्टिलेटर्सचा विशेष कक्ष दुस-या लाटेपासूनच तसाच कार्यान्वित ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यमान परिस्थिती लक्षात घेऊन त्यामध्ये अधिक भर घालीत एमजीएम रुग्णालय कामोठे याठिकाणी कार्यान्वित 100 आयसीयू बेड्सची डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल सुविधा पुन्हा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे सेक्टर 5 कोपरखैरणे येथील समाज मंदिरातील कोव्हीड केअर सेंटर (140 बेड्स), सेक्टर 5 ऐरोली येथील समाज मंदिरातील कोव्हीड केअर सेंटर (110 बेड्स), सेक्टर 3 बेलापूर येथील समाज मंदिरातील कोव्हीड केअर सेंटर (101 बेड्स) तसेच नेरुळ येथील आगरी कोळी भवनातील कोव्हीड केअर सेंटर (100 बेड्स) ही तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्यात आलेली कोव्हीड केअर सेंटर्सही सुरु करण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे.
विद्यमान रुग्णसंख्या वाढीचा आवाका लक्षात घेऊन सेक्टर 16 वाशी येथील नमुंमपा विद्यालय (175 बेड्स), सेक्टर 7 घणसोली येथील नमुंमपा विद्यालय (209 बेड्स) व सेक्टर 14 ऐरोली येथील नमुंमपा विद्यालय (160 बेड्स) अशी 544 सर्वसाधारण बेड्स क्षमतेची 3 नवीन कोव्हीड केअर सेंटर्सही वापरासाठी तयार आहेत.
याशिवाय आणखी 13 ठिकाणी एकूण 2670 बेड्स क्षमतेच्या कोव्हीड केअर सेंटर्सचे काम प्रगतीपथावर आहे.
यासोबतच महानगरपालिकेच्या नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 200 आयसीयू बेड्स क्षमतेची सक्षम आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आली असून त्याचा उपयोग कोव्हीड कालावधीनंतरही सर्वसाधारण रुग्णांवरील उपाचारासाठी होणार आहे. यामध्ये मुलांवरील उपचारासाठी सर्वसाधारण, ऑक्सिजन, आयसीयू अशा तिन्ही प्रकारच्या राखीव सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
अशाप्रकारे नमुंमपा कोव्हीड केंद्रांमध्ये 5164 सर्वसाधारण बेड्सची सुविधा कार्यान्वित करण्याची तयारी असून नमुंमपा डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर येथे 3052 व खाजगी रूग्णालये येथे 1000 हून अधिक अशा 4052 हून अधिक ऑक्सिजन बेड्सची सज्जता ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 725 आयसीयू बेड्स आणि खाजगी रूग्णालयातील 475 बेड्स अशाप्रकारे 1200 हून अधिक आयसीयू बेड्सचे नियोजन करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे एकूण 12 हजारहून अधिक बेड्सची सज्जता नवी मुंबई महानगरपालिकेने करून ठेवलेली आहे. तशा प्रकारचे निर्देश खाजगी रूग्णालयांनाही देण्यात आलेले आहेत.
सध्या महापालिका क्षेत्रात 17 हजाराहून अधिक ॲक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून कोरोना बाधितांच्या संख्येत सद्यस्थितीत होत असलेली वाढ लक्षात घेऊन उपचारासाठी नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये याची पूर्ण खबरदारी घेत महानगरपालिकेने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रकारच्या बेड्सच्या संख्येत आवश्यक वाढ केलेली आहे.
नागरिकांना बेड्स व रुग्णवाहिका उपलब्धतेत कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये याकरिता सुरु केलेले कॉल सेंटर दुसरी लाट ओसरल्यानंतरही पोस्ट कोव्हीड रूग्णांसाठी महानगरपालिकेने कार्यान्वित ठेवले होते. ते पुन्हा अधिक कृतीशील केले असून 24 X 7 सुरु असणा-या या कॉल सेंटरवर नागरिक 022-27567460 या क्रमांकावर संपर्क साधून बेड्स व रुग्णवाहिका उपलब्धतेची अडचण दूर करू शकतात.
कोरोना बाधितांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याप्रमाणेच कोरोनाचा विषाणू आहे तिथेच रोखण्यासाठी टारगेडेट टेस्टींगवर भर दिला जात असून दररोज 11 हजाराहून अधिक नागरिकांचे कोव्हीड टेस्टींग करण्यात येत आहे.
याशिवाय लसीकऱणाचा दुसरा डोसही लवकरात लवकर पूर्ण व्हावा याकडे विशेष लक्ष देत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. सध्या 92.16 टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असून आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे व कोमॉर्बिडिटी असणारे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांच्याही प्रिकॉशन डोसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळाला असून 90.27 टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कोव्हीड प्रतिबंधासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करीत असून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता सुसज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनीही मास्कचा नियमित वापर करून कोरोनाच्या विषाणूपासून स्वत:ला वाचवावे व कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे काटेकोर पालन करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 17-01-2022 13:44:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update