राष्ट्रीय डेंगी दिनानिमित्त संपूर्ण नमुंमपा क्षेत्रात व्यापक जनजागृतीपर शिबिरांचे आयोजन
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार 16 मे या दिवशी राष्ट्रीय डेंगी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या दिवशी सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत डेंगीविषयक जनजागृतीकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 23 ठिकाणी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरांमध्ये 4557 नागरिकांनी प्रत्यक्ष भेट दिली. त्याठिकाणी 555 नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
डेंगी विषयक जनजागृती व्हावी यादृष्टीने 22 ठिकाणी प्रदर्शने व प्रात्यक्षिके आणि 13 ठिकाणी प्रभातफे-यांचे आयोजन करून व्यापक जनजागृती करण्यात आली. यामध्ये बॅनर्स, पोस्टर्स, हस्तपत्रकेही वितरीत करण्यात येऊन नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आगामी पावसाळा कालावधी लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 15 एप्रिल 2023 पासून घरांतर्गत डासोत्पत्ती स्थाने तपासणीची विशेष मोहीम राबविली जात असून पावसाळा कालावधी संपेपर्यंत ही मोहीम संपूर्ण महापालिका क्षेत्रात राबविली जाणार आहे.
डेंगी हा आजार विशेषत: एडिस डासांची मादी चावल्यामुळे होत असल्याने याबाबत जनजागृती करण्यासोबतच डासोत्पत्ती स्थाने शोधकार्यही सुरु असते. यामध्ये एडिस डासांच्या अळ्या असलेली 452 डासउत्पत्ती स्थाने आढळून आली आहेत.
शोध मोहिमेअंतर्गत 15 एप्रिल पासून 210867 घरांना भेटी दिलेल्या असून 413888 डासोत्पत्ती स्थाने तपासलेली आहेत. त्यामध्ये 30 स्थानांवर एनॉफिलीस, 452 स्थानांवर एडिस व 14 स्थानांवर क्युलेक्स डासांची उत्पत्ती स्थाने आढळलेली आहेत. ही 495 डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आलेली आहेत.
आपल्या घर व परिसरात डास उत्पत्ती होऊ नये याकरिता नागरिकांनी काळजी घ्यावयाची असून -
- आपले घर, कार्यालय परिसरात पाणी साचू देऊ नये.
- गच्चीवरील व घरांतर्गत लॉफ्ट टॅंक, सोसायटीमधील सर्व पाण्याच्या टाक्या यांना झाकणे लावून बंदिस्त करावे. तसेच व्हेंट पाईप यांना डास प्रतिबंधात्मक जाळ्या लावाव्यात.
- गच्चीवर अथवा घराच्या परिसरात भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे, उधड्यावरील टायर्स असे साहित्य पडून असल्यास ते नष्ट करावे.
- फुलदाण्या, कुंड्यांखालील ट्रे, फेंगशुई यामध्ये साचलेले पाणी किमान आठवड्यातून एकदा बदलावे.
- घरामधील व घराबाहेरील पाणी साठविण्याचे ड्रम, टाक्या, भांडी आठवडयातून एकदा काढून पूर्णपणे कोरडे करावेत.
- कुंड्यांखाली असलेले ट्रे, फ्रिज डिस्फ्रॉस्ट ट्रे तसेच एसी डक्ट यामध्ये साचलेले पाणी नियमित काढून टाकावे.
- डास प्रतिबंधात्मक मच्छरदाणीचा शक्य झाल्यास वापर करावा.
- गप्पी मासे डासांच्या अळ्या खातात हे लक्षात घेता कोणाला गप्पी माशांची आवश्यकता असल्यास नजिकच्या महापालिका नागरी आरोग्य केंद्रामार्फत गप्पी मासे प्राप्त करून घेता येतील.
- सर्व प्रकारच्या तापाच्या रुग्णांची मोफत रक्त तपासणी महानगरपालिकेमार्फत केली जात असून घरी येणारे आरोग्य कर्मचारी यांच्याप्रमाणेच महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रे व रुग्णालये याठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे.
- संशयित हिवताप / डेंगी रुग्ण आढळल्यास जवळच्या महानगरपालिका रुग्णालयास त्वरित माहिती द्यावी व रुग्ण संशोधन कार्यवाहीकरिता घरी येणा-या आरोग्य कर्मचा-यांना तसेच फवारणी कामगारांना सहकार्य करावे.
राष्ट्रीय डेंगी दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने विशेष शिबिरांचे आयोजन करीत नागरिकांमध्ये जनजागृती व रक्त तपासणी करण्यात आली असून नागरिकांनी हिवताप, डेंगी आजाराचा प्रादुर्भाव आसपास आढळल्यास तसेच डासांचा प्रादुर्भाव जाणवल्यास आपल्या नजिकच्या आरोग्य केंद्रात किंवा नमुंमपा रुग्णालयात तातडीने संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 18-05-2023 13:20:14,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update