ऐरोलीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात संविधान दिनी 26 नोव्हेंबरला प्रा.अविनाश कोल्हे यांचे विशेष व्याख्यान
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांना केंद्रीभूत ठेवून उभारण्यात आले असल्याने तसेच या ठिकाणी तशा स्वरुपाचे माहिती व ज्ञानसंपन्न नानाविध उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याने ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात आहे.
या अनुषंगाने स्मारकामध्ये मागील दोन वर्षे राबविली जाणारी ‘विचारवेध’ ही व्याख्यानमाला नागरिकांच्या पसंतीस उतरली असून प्रत्येक व्याख्यानाला वाढता प्रतिसाद लाभताना दिसत आहे. महामानवांचे जयंती व स्मृतीदिन त्यांच्या प्रेरक विचारांचा जागर करुन साजरे केले जावेत या भूमिकेतून नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित विचारवेध व्याख्यान शृंखलेअंतर्गत आयोजित व्याख्यानांमधून महामानवांना वैचारिक आदरांजली अर्पण करण्याची परंपरा जपली जात आहे.
दि. 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात भारतीय संविधान दिन अतिशय उत्साहात साजरा केला जात असून जगातील सर्वात मोठी राज्यघटना असलेल्या आपल्या संविधानाविषयीचा अभिमान आणि आदर व्यक्त केला जात आहे. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटनेची मसुदा समिती (Drafting Committee) स्थापन झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्विकृत करण्यात आली. समितीचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यावर स्वाक्षरी केली.
प्रत्येक भारतीयाला त्याच्या स्वातंत्र्याचे व जगण्याचे अधिकार आणि हक्क तसेच कर्तव्ये यांचे स्पष्ट आणि सखोल मार्गदर्शन घटना करते. भारतीय समाजाची रचना ही समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय व्यवस्था या तत्वावर व्हावी असे संविधान स्पष्ट करते.
अशा आपल्या संविधानातील मूलतत्वांविषयी अधिकचे मार्गदर्शन व्हावे या दृष्टीने संविधान अभ्यासक असणारे सुप्रसिध्द साहित्यिक आणि राज्यशास्त्राचे व्यासंगी प्राध्यापक श्री. अविनाश कोल्हे यांचे ‘भारतीय संविधान : इतिहास, वारसा आणि वैशिष्ट्ये’ या विषयावर विशेष व्याख्यान रविवार, दि.26 नोव्हेंबर 2023 या संविधान दिनी सायं. 6.30 वा., भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली – मुलुंड खाडी पूलाजवळ, सेक्टर 15, ऐरोली, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
तरी नागरिकांनी भारतीय संविधानाविषयीचा आपल्या मनातील आदर व्यक्त करण्यासाठी व संविधानाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या व्याख्यानास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 23-11-2023 15:40:57,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update