नवी मुंबई महानगरपालिका शुटिंगबॉल संघ राष्ट्रीय स्तरावरील तीन स्पर्धांमध्ये अजिंक्यपदाचा मानकरी
नवी मुंबई महानगरपालिका शुटिंगबॉल संघाने नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विजेतेपद संपादन करुन संपुर्ण शुटिंगबॉल क्षेत्रात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात आपले नाव कोरले आहे. सन 1998 पासून 2008 पर्यंत सातत्याने दहा वर्षे संपूर्ण देशात शुटिंगबॉल खेळात नवी मुंबई महानगरपालिका संघाने नावलौकीक केलेला आहे. पुन्हा एकदा महानगरपालिकेने नव्या दमातील होतकरु खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याने महापालिकेचा संघ राष्ट्रीय स्तरावर नावलौकीक करत आहे.
नुकतेच दि.11 व 12 जानेवारी, 2020 रोजी पाटण स्पोर्टस क्लब पाटण, जि.सातारा येथील स्पर्धेत तसेच दि. 13 जानेवारी, 2020 रोजी भारतमाता स्पोर्टस क्लब, सदर बझार सातारा येथे झालेल्या अखिल भारतीय स्तरावरील 40 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेमध्ये तसेच दि. 18 व 19 जानेवारी, 2020 रोजी मन्दसौर, जि. रतलाम, मध्यप्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेत अशा सलग तीन ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील शुटिंगबॉल स्पर्धांमध्ये अंतिम विजेतेपद पटकावत नवी मुंबई महानगरपालिका शुटिंगबॉल संघाने आपली दखल शुटिंगबॉल क्षेत्रामध्ये घेण्यास भाग पाडले आहे.
या स्पर्धांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शुटिंगबॉल संघाने अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची व आयोजकांची मने जिंकली व पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे मत शुटिंगबॉल असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह जाणकार प्रेक्षक व्यक्त करीत आहेत..
महापालिका शुटिंगबॉल संघाने सलग तीन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अजिंक्यपद मिळविल्याबद्दल महापौर श्री.जयवंत सुतार, उपमहापौर श्रीम.मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, नगरसेविका श्रीम.अनिता मानवतकर तसेच क्रीडा विभागाचे उपायुक्त श्री.नितिन काळे यांनी राजीव गांधी क्रीडासंकुलात संपन्न झालेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा शुभारंभप्रसंगी अभिनंदन केले.
Published on : 24-01-2020 13:41:04,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update