नवी मुंबई महापौर चषक बालनाट्य स्पर्धा महाअंतिम सोहळ्याला उत्साहात प्रारंभ
व्यक्तीच्या प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक आहेच, मात्र व्यक्तीमत्वाच्या विकासासाठी कोणता तरी छंद जोपासायला हवा, त्यामुळे जीवन संपन्न आणि समृध्द होते असे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी नवी मुंबई शहर निर्मितीच्या आधीपासून येथील गावागावांमध्ये नाट्य, गायन, भजनी परंपरा जोपासली जात असून या सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्याचे काम विविध उपक्रमांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने करीत असल्याचे मत व्यक्त केले. या अनुषंगाने मुलांच्या अंगभूत कलागुणांना लहानपणापासूनच वाव मिळून उद्याचे गुणसंपन्न कलावंत घडावेत याकरिता बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये राज्यातील 35 बालनाट्य समुह सहभागी झाले असल्याबद्दल महापौर महोदयांनी समाधान व्यक्त केले. विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित ‘नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा’ महाअंतिम सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त श्री. नितीन काळे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व श्रीम. अभिलाषा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी नेते आणि अभिनेते यामधील साम्य दाखवत लहानपणापासून रंगभूमीवर काम करण्याची सवय झाल्याने आत्मविश्वास वाढतो व त्याचा उपयोग पुढील आयुष्यात निश्चित होतो असे सांगत सर्व बालकलावंतांना शुभेच्छा दिल्या. नवी मुंबईमध्ये लहान मुलांच्या अंगभुत गुणांना वाव देणारे बालभवन असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती देत प्रत्येक माणसात एक कलाकार दडलेला असतो, त्याला जागृत करण्याचे काम या बालना्टय स्पर्धेतून होत असल्याचे सांगितले व मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या बालनाट्य समुहांचे कौतुक करीत नवी मुंबई नगरीत स्वागत केले.
30, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या 3 दिवसांत सादर झालेल्या तालीम स्वरूपातील प्राथमिक फेरीत नवी मुंबईसह ठाणे जिल्हा, मुंबई, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर अशा राज्याच्या विविध भागांतून 35 बालनाट्यांनी सहभाग घेतला होता. त्यामधून महाअंतिम फेरीसाठी 8 बालनाट्यांची निवड प्राथमिक फेरीचे परीक्षक ठाण्यातील अभिनय कट्टा या राज्यभरात गाजत असलेल्या संकल्पनेचे संयोजक सुप्रसिध्द दिग्दर्शक श्री. किरण नाकती आणि अभिनेते श्री. प्रसाद दाणी यांनी केली.
प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या 8 बालनाट्यांमध्ये एम.जी.परूळेकर मित्र मंडळ वसई यांचे ‘अप्पूराजा’, उत्कर्ष मंडळ मालाड यांचे ‘वारी’, सेक्रेड हार्ट स्कुल वरप कल्याण यांचे ‘बदला’, संदेश विद्यालय विक्रोळी यांचे ‘मोठेपण देगा देवा’, मित्र सहयोग ठाणे यांचे ‘गोष्ट जीवांची’, कृपा शैक्षणिक सामाजिक बहु संस्था नाशिक यांचे ‘संगीत वात्सल्य’, पार्ले टिळक विद्यालय मुंबई यांचे ‘जोकर’ आणि शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान नवी मुंबई यांचे ‘तळमळ एका अडगळीची’ या निवडक बालनाट्यांचा समावेश आहे.
या अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या 8 बालनाट्यांचे सादरीकरण सकाळी 10 वा. पासून होत असून त्याचे परीक्षण सुप्रसिध्द दिग्दर्शक अभिनेते श्री. मंगेश कदम, नामवंत अभिनेते श्री. पंढरीनाथ (पॅडी) कांबळे व नामांकीत अभिनेत्री श्रीम. अंकिता जोशी पनवेलकर असे नाट्य, सिने क्षेत्रातील नामांकीत रंगकर्मी करीत आहेत. पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी लोकप्रिय अभिनेते श्री. सुनिल बर्वे बालकलावंतांना शुभेच्छा देण्याकरीता उपस्थित राहणार आहेत.
या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या बालनाट्यास रु. 25 हजार, व्दितीय क्रमांकाच्या बालनाट्यास रु.20 हजार, तृतीय क्रमांकाच्या बालनाट्यास रु.15 हजार इतकी पारितोषिक रक्कम प्रशस्तिपत्र व स्मृतीचिन्हासह प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ दोन बालनाट्यांस प्रत्येकी रू. 5 हजार रक्कमेचे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लक्षवेधी बालनाट्यास रु. 10 हजार इतकी बक्षिस रक्कम दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक स्वरुपात उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, रंगभूषा, अभिनेता, अभिनेत्री यांना प्रथम रु.1 हजार व प्रशस्तीपत्र आणि सन्मानपत्र, व्दितीय रु.750 आणि तृतीय रू. 400 इतकी बक्षिस रक्कम दिली जाणार असून प्रमाणपत्र देऊन विजयी कलाकारांना गौरविण्यात येणार आहे.
Published on : 03-02-2020 11:17:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update