नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2020 प्रारुप प्रभाग रचना हरकती / सूचनांवर सुनावणी संपन्न
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2020 करीता प्रारुप प्रभाग रचना हरकती / सूचना सुनावणी मा. राज्य निवडणूक आयोगामार्फत प्राधिकृत अधिकारी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. असिम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात पार पडली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे उपआयुक्त श्री. अविनाश सणस, कोकण विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी उपआयुक्त श्री. मनोज रानडे, जिल्हाधिकारी ठाणे यांचे प्रतिनिधी प्रशासन अधिकारी श्री. बी.जे. निपुर्ते तसेच अवर सचिव श्री. अतुल जाधव, निवडणुक विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे हे अधिकारी उपस्थित होते.
सकाळी 11 वाजता मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात सुरु झालेल्या सुनावणीमध्ये प्रभाग क्रमांक 21 व 22 याकरीता 257 तसेच प्रभाग क्र. 16 करीता 168 हरकती / सूचना, त्याचप्रमाणे इतर प्रभाग मिळून एकूण 524 हरकती / सूचना प्राप्त झाल्या होत्या. या निवेदनकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेण्यात आले व त्याबाबत तपासणी करून योग्य निर्णय कळविण्यात येईल असे प्राधिकृत अधिकारी श्री. असिम गुप्ता यांनी सांगितले. सुनावणीनंतर वृत्तपत्र, वृत्तचित्रवाहिनी प्रतिनिधींशी वार्तालाप करताना श्री. असिम गुप्ता यांनी आरक्षणाच्या पध्दतीची माहिती दिली व प्रत्येक निवेदनकर्त्याच्या मागणीचा सुयोग्य विचार करण्यात येईल असे स्पष्ट केले. याबाबतची सर्व माहिती नागरिकांसाठी संकेतस्थळावरुन उपलब्ध करून द्यावी अशा सूचना त्यांनी निवडणूक विभागास दिल्या.
Published on : 17-02-2020 08:12:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update