श्रीगणेश विसर्जनासाठी विभागांमध्ये नागरिकांना सुविधाजनक ठिकाणी कृत्रिम तलाव निर्मितीवर भर देण्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश
कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा श्रीगणेशोत्सव साजरा होत असून नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने निर्विघ्नपणे उत्सव साजरा होण्याकरिता नियोजन केले आहे. यापूर्वी 25 जुलै रोजी आठही विभागीय स्तरावर महापालिका व पोलीस अधिकारी यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिका-यांची बैठक झाली आहे.
या अनुषंगाने आज महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व श्रीम. सुजाता ढोले तसेच पोलीस उपआयुक्त श्री. पंकज डहाणे आणि महानगरपालिकेचे संबंधित उपआयुक्त, सर्व कार्यकारी अभियंता यांचेसह गणेशोत्सव आयोजन पूर्वतयारी बैठक घेऊन आठही विभाग अधिकारी यांच्याशी बेवसंवाद साधला.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकान्वये यावर्षी श्रीगणेमूर्तींची उंची ही सार्वजनिक उत्सवाकरिता 4 फूट व घरगुती उत्सवाकरिता 2 फूटांपर्यंत असावी असे सूचित करण्यात आले असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे अशा सूचना आयुक्तांनी याप्रसंगी दिल्या.
यावर्षीच्या गणेशोत्सवात कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने गर्दी टाळणे व सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे ही सर्वात महत्वाची बाब असून श्रीगणेशमूर्ती दुकानातून घरी आणताना व विसर्जन करताना कमीत कमी व्यक्ती त्याठिकाणी येतील हे पहावे, तशा प्रकारच्या सूचना गणेशमूर्ती विक्रेत्यांना द्याव्यात आणि याकडे काटेकोर लक्ष द्यावे असे आयुक्तांनी सूचित केले.
विशेषत्वाने विसर्जनाच्या दिवशी गर्दी न होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांमध्ये नागरिकांना सोयीचे ठरेल अशा जागांवर जास्त संख्येने कृत्रिम तलाव निर्माण करावेत असे सूचित करतानाच तलाव निर्मितीसोबत तलावातील पाणीव्यवस्था, पूजा व आरतीसाठी टेबल्स, विसर्जनासाठी स्वयंसेवक व्यवस्था अशा बाबींकडेही लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. यादृष्टीने सर्व विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी संबंधित विभागाचे सहा. आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने विभागातील संभाव्य जागांचे सर्वेक्षण करावे व तत्परतेने कार्यवाही सुरू करावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. कृत्रिम तलाव निर्मितीसाठी काही स्वयंसेवी संस्था, गणेशोत्सव मंडळे पुढाकार घेत असल्यास त्यांचे स्वागत असल्याचे सांगत अशा संस्था, मंडळे यांना प्रोत्साहित करावे व संपूर्ण सहकार्य करावे असे सर्व विभागांच्या सहा. आयुक्तांना आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. या तलावांची निर्मिती ही श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी व्हावी असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 23 मुख्य विसर्जन स्थळांशेजारी मोठ्या आकाराचे कृत्रिम तलाव निर्माण करावेत व प्रतिवर्षीप्रमाणे सर्व सुयोग्य व्यवस्था करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. त्यामध्ये प्रामुख्याने निर्माल्याचे ओले व सुके असे वेगवेगळे संकलन करणे, त्याचे पावित्र्य जपत योग्य विल्हेवाट लावणे तसेच कोणत्याही परिस्थितीत हार व पुजा साहित्य पाण्यात टाकले जाणार नाही याची दक्षता घेण्याचे व यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.
नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालयाच्या वतीने श्रीगणेशोत्सव नागरिकांना उत्साहाने साजरा करता यावा यासाठी नियोजन केले जात असून सुजाण नागरिकांनी यंदाची कोव्हीड 19 ची परिस्थिती लक्षात घेऊन स्वयंशिस्तीचा अवलंब करावा व सोशल डिस्टन्सींग आणि इतर बाबींचे पालन करावे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करीत आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही व आपल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी आणि यावर्षीचा गणेशोत्सव आरोग्योत्सव स्वरूपात साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 06-08-2020 16:46:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update