वैविध्यपूर्ण स्वच्छता उपक्रमांतून नवी मुंबईकरांची महात्मा गांधीजींना आदरांजली
महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील स्वच्छताविषयक विशेष कार्यक्रमात आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' ला प्रारंभ होत असताना 'निश्चय केला - नंबर पहिला' असे देशात प्रथम क्रमांकाचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून लोकसहभागातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
त्यासोबतच 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत केंद्र सरकारमार्फत प्राप्त सूचनांनुसार 'स्वच्छता के 6 साल - बेमिसाल' या उपक्रमांतर्गत महापालिका क्षेत्रात विविध विभागांमध्ये स्वच्छताविषयक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
वाशी विभागात 'लेट्स सेलिब्रेट फिटनेस' या संकल्पनेवर आधारित 'स्वच्छता रन' मध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे सहभागी झाले. त्यांच्या समवेत विभाग अधिकारी श्री. शंकर खाडे, उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री. प्रल्हाद खोसे आणि इतर अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, स्वच्छताप्रेमी नागरिक यांनी सहभागी होत स्वच्छता संदेशाचे प्रसारण केले. त्याचप्रमाणे वाशी विभागात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीमांचे आयोजन करण्यात आले होते.
कोपरखैरणे विभागात विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या व परिमंडळ उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगेरे आणि विभाग अधिकारी श्री. अशोक मढवी यांच्या हस्ते नवी मुंबईला देशात तृतीय क्रमांक मिळवून देण्यासाठी योगदान देणा-या सफाई कर्मचा-यांचा स्वच्छता अधिकारी श्री. दिनेश वाघुळदे यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
बेलापूर विभागात विविध स्थळांवर स्वच्छता करतानाच सरोवर विहार परिसरात मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे व विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच स्वच्छतेची शपथही घेण्यात आली. याठिकाणी रोटरी क्लब च्या सहयोगाने 'बॉटल फॉर चेंज' हा प्लास्टिक बॉटल्सविषयी वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
तुर्भे विभागाचे विभाग अधिकारी श्री. सुबोध ठाणेकर आणि स्वच्छता अधिकारी श्री. सुधाकर वडजे यांनी विभागातील मुख्य चौकांमध्ये स्वच्छता कर्मचारी यांच्यामार्फत स्वच्छतेविषयी तसेच कोव्हीड सुरक्षा साधनांचा उपयोग करण्याविषयी फलक प्रदर्शित करून अभिनवरित्या जनजागृतीपर संदेश प्रसारण केले. त्याचप्रमाणे मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींना गुलाबपुष्प भेट देऊन ते स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याला धोकादायक वर्तन करीत असल्याची जाणीव करून देण्यात आली.
नेरूळ विभागातही विविध ठिकाणी विभाग अधिकारी श्री. अनुप डुरे व स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून स्वच्छता विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशाल क्वारी येथील नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात एन्व्हायरमेन्ट लाईफ संस्थेच्या सहयोगाने स्वच्छतेची विशेष मोहिम राबविण्यात आली.
ऐरोलीमध्ये विभाग अधिकारी श्री. अनंत जाधव आणि स्वच्छता अधिकारी श्री. सुभाष म्हसे यांच्या पुढाकारातून विभाग कार्यालय परिसर सफाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याचप्रमाणे समतानगर येथे शेल्टर असो. व युनिसेफच्या माध्यमातून कोव्हीडच्या काळात सतत हात धुण्याचा संदेश प्रसारित करण्यासाठी साबणाचे वाटप करण्यात आले. विभागात वेगवेगळ्या भागात स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले.
घणसोलीतही विभाग अधिकारी श्री. महेंद्रसिंग ठोके व स्वच्छता अधिकारी श्री. विनायक जुईकर यांच्या माध्यमातून तसेच दिघा विभाग अधिकारी श्रीम. प्रियांका काळसेकर आणि स्वच्छता अधिकारी श्री. सतिश सनदी यांच्या पुढाकारातून स्वच्छता उपक्रम आयोजन करण्यात आले.
सर्वच ठिकाणच्या मोहिमांमध्ये स्वच्छताप्रेमी नागरिकांचा उत्तम सहभाग लाभला आणि स्वच्छताविषयक विविध उपक्रमांच्या माध्यमातून यावर्षीच्या स्वच्छता अभियानास प्रारंभ झाला.
Published on : 03-10-2020 20:45:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update