जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिका मुख्यालय आवारात आयुक्तांसह अधिका-यांनी केले वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयकॉनिक इमारत म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या आवारात महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण संपन्न झाले. याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उद्यान विभागाचे उपायुक्त श्री. मनोजकुमार महाले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परवाना विभागाचे उपआयुक्त श्री. श्रीराम पवार, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड, उद्यान विभागाचे सहा. आयुक्त श्री. अनंत जाधव आणि इतर अधिकारी यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण संपन्न झाले.
याप्रसंगी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी समस्त नवी मुंबईकर नागरिकांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सध्याच्या काळात सातत्याने येणारी चक्रीवादळे, पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीमधून आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाचे धोके जाणवत असल्याचे सांगत आयुक्तांनी प्रत्येकाने पर्यावरणाचे भान राखत आपल्या जीवनशैलीत पर्यावरणपूरक बदल घडविण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
कोव्हीडच्या दुस-या लाटेत मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासली हे लक्षात घेऊन आपल्याला ऑक्सिजन देणारी झाडे लावण्यावर व त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यावर भर दिला पाहिजे. त्याकरिता आजच्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत वृक्षारोपणात व्यापक लोकसहभाग वाढावा याकरिता "माझी स्वत:ची ऑक्सिजन बँक" (#MyOwnOxygenBank) ही वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये "झाडे लावूया - सेल्फी काढूया व महानगरपालिकेच्या सोशल मिडीयावर झळकूया" असे आवाहन करीत नागरिकांना उद्यान विभागामार्फत मोफत वृक्षरोपे उपलब्ध करून दिली जात असून यामध्येही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले.
पर्यावरणप्रेमी रिक्षाचालक उमर खान यांचे आयुक्तांकडून विशेष कौतुक आणि सन्मान
आपल्या रिक्षामध्ये फुलझाडांच्या कुंड्या लावून तसेच रिक्षाच्या छतासह इतर भाग हिरवागार करणारे व अंतर्गत भागातही हिरवळ राखणारे रिक्षाचालक उमर खान यांनी स्वयंस्फुर्तीने जपलेल्या वृक्षप्रेमाचे आयुक्तांनी कौतुक केले. करावेगांवात राहणारे उमर खान मागील 4 वर्षापासून रिक्षा चालवित असून 2 वर्षांपासून त्यांनी आपल्या रिक्षाला हरित स्वरूप दिले आहे. अशा प्रकारचे पर्यावरणप्रेम प्रत्येकाने अनुकरण करण्यासारखे आहे असे सांगत आयुक्तांनी फुलझाडाची कुंडी प्रदान करून त्यांचा विशेष सन्मान केला. यावेळी उमर खान यांच्याही हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्या विनंतीनुसार आयुक्तांनी हरित रिक्षात वृक्षारोपण स्थळापासून महापालिका प्रवेशव्दारापर्यंत सफरही केली.
Published on : 05-06-2021 13:55:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update