आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिडको सेंटरमधील कोरोनाबाधितांनी गिरवले योगाचे धडे

कोरोनाविरोधातील लढाईत शारीरिक व मानसिक बळ देणा-या योगासनांचा फार मोठा वाटा असल्याचे दिसून आले आहे. देशातील सर्वोत्तम कोव्हीड सेंटरमध्ये गणल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको कोव्हीड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी येथे सुरूवातीपासूनच योगासनांचा आधार घेतला जात आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिडको एक्झिबिशन सेंटरमधील कोरोनाबाधितांनी योगाचे धडे गिरवत अत्यंत उत्साहाने आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.
यावर्षी 'योग फॉर वेलनेस' ही आंतराराष्ट्रीय योग दिवसाची संकल्पना जाहीर करण्यात आली असून शारीरिक व मानसिक कल्याणासाठी योगाभ्यास हा उद्देश नजरेसमोर ठेवण्यात आलेला आहे. योगाचा रोगप्रतिकारशक्ती वाढीवर सकारात्मक परिणाम होत असल्याने सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये दररोज सकाळी 1 तास योगक्रिया करून घेतल्या जात आहेत. एकही सुट्टी न घेता आठवड्याचे सातही दिवस हे योग वर्ग याठिकाणी राबविले जात असून दररोज 1 तासाच्या योग सत्रामध्ये सुरूवातीचा अर्धा तास योगासने व त्यानंतर 15 मिनिटे प्राणायाम आणि त्यानंतर 15 मिनिटे ध्यानधारणा करून घेतली जात आहे.
कोव्हीडविरूध्द लढताना मनशक्ती हा एक महत्वाचा भाग असून योगासनांमधील प्राणायाममुळे श्वासाचे संतुलन तसेच शरीरासह मनाचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढविण्यासही याचा उपयोग होतो. तसेच विविध साध्या सहज करता येणा-या योग प्रकारामुळे शरीराच्या हालचाली होऊन शरीर सुदृढ राखण्यास मदत होते. कोव्हीड सेंटरमधील या साध्यासोप्या योगासनांचा फायदा होत असून इथे दररोज सकाळी योगासने करण्याची लागलेली सवय येथून बरे होऊन घरी गेल्यानंतरही कायम रहात असल्याचे अभिप्राय अनेक कोरोनामुक्त नागरिकांकडून प्राप्त होत आहेत.
आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे अनुभवी योग प्रशिक्षक श्री. प्रमोद कोकाणे हे एक सामाजिक बांधिलकी म्हणून सिडको कोव्हीड सेंटरमधील कोरोनाबाधितांना योग प्रशिक्षण देत असून आज आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्यांनी सुरूवातीला योगसाधनेचे महत्व विषद केले व सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा देत योग क्रिया करून घेतल्या.
नवी मुंबई महानगरपालिका कोरोनाबाधितांवर उपचार करताना सर्व प्रकारच्या उपयोगी पध्दतीचा वापर करीत असून मानसिक व शारीरिक बळ वाढविणा-या योगसाधनेतूनही अनेक रूग्णांना कोव्हीड विरोधातील लढ्यात आधार मिळाल्याचा अनुभव असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी योगसाधनेचे महत्व ओळखून प्रत्येक नागरिकाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्राणायमसह योगासनांचा आपल्या दैनंदिन जीवनशैलीत अंगिकार करावा असे आवाहन करीत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Published on : 21-06-2021 15:39:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update