राष्ट्रीय जंतनाशक विशेष मोहीमेला नवी मुंबईत सुरूवात

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आजपासून 28 तारखेपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 'राष्ट्रीय जंतनाशक मोहीम' राबविण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे. या अंतर्गत 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना वयोगटानुसार निश्चित केल्याप्रमाणे जंतनाशक गोळी देण्यात येत आहे. नागरी आरोग्य केंद्र स्तरावर राबविण्यात येणा-या या विशेष मोहीमेमध्ये आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक यांचेमार्फत गृहभेटीव्दारे मुलांना त्यांच्या वयोगटाप्रमाणे ही गोळी दिली जात आहे. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्याकरिता कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे रितसर प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे.
1 ते 19 वयोगटातील साधारणत: 28 टक्के बालकांमध्ये आतड्यांचा कृमीदोष आढळत असून तो मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतांपासून होतो. परिसर स्वच्छतेचा अभाव हे याचे एक प्रमुख कारण असून कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण असतो. यामुळे बालकांची शारीरिक व बौध्दीक वाढ खुंटत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी देशभराच राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत ही मोहींम राबविण्यात येत असून 1 ते 2 वयोगटातील मुलामुलींना 200 मिलिग्रॅमची गोळी चुरा पावडर करून पाण्याबरोबर देण्यात येईल तसेच 2 ते 19 वयोगटातील मुलामुलीना 400 मिलिग्रॅमची गोळी चुरा अथवा तुकडे करून चावून खाण्यास स्वच्छ पाण्याबरोबर देण्यात येईल. अलबेंडेझोलची गोळी उपाशीपोटी देण्यात येणार नाही. ही गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तथापि पोटात जंताचा प्रादुर्भाव झालेला असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम तात्कालिक किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये असे सूचित करण्यात येत आहे.
नवी मुंबईकर नागरिकांनी राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येणारी जंतनाशक मोहीम यशस्वी करण्यासाठी व आपल्या मुलांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी 19 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना 21 ते 28 सप्टेंबर 2021 या कालावधीत जंतनाशक गोळी देऊन रक्तक्षय व कुपोषणापासून त्यांचे रक्षण करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 21-09-2021 13:56:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update