अभियंता दिनी महानगरपालिका मुख्यालयात विश्वेश्वरय्या यांना अभिवादन करीत विशेष कार्यक्रम संपन्न
नवी मुंबईच्या नावलौकीकात अभियांत्रिकी विभागाचे महत्वाचे योगदान असून याचा अभिमान बाळगतानाच नवनिर्मिती, सर्जनशीलता हा इंजिनिअरींग शब्दाचा खरा अर्थ असून आपण काम करताना या दृष्टीने करतो काय याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून प्रत्येक अभियंत्याने वेगळेपण जपणारे काम करावे अशा शब्दात अभियंता दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिका अभियांत्रिकी विभागाच्या वतीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात अभियंत्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित 'अभियंता दिन' समारंभात आयुक्त आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, समारंभाचे प्रमुख वक्ते श्री. राजेंद्र कुमार सराफ, माजी शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व श्री. शिरीष आरदवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कामातील एखादी त्रुटी दर्शविण्यात आली तर त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्यात अभियांत्रिकी विभाग आघाडीवर असतो ही इतर विभागांनी अनुकरण करण्याची गोष्ट असून दैनंदिन काम करताना आपण करीत असलेल्या कामाबद्दल आत्मसंतुष्टता हा सर्वात मोठा धोका असून त्यापासून दूर राहिले पाहिजे व सतत अद्ययावत माहितीचा अभ्यास करून त्याबद्दलचे वाचन वाढवून त्या ज्ञानाचा काम करताना वापर केला पाहिजे असेही आयुक्तांनी सांगितले.
शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी आपल्या मनोगतात महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने केलेल्या कामांचा आढावा घेत आगामी नियोजित प्रकल्प व सुविधा कामे या विषयी विस्तृत माहिती दिली. कोव्हीड काळातील आपल्या कामाची दखल राज्य व राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून तक्रार निवारणाच्या जलद कार्यवाहीची दखल आस्कीसारख्या मानांकित संस्थेकडून घेतली गेली आहे ही अभिमानाचा बाब असल्याचे सांगितले. स्थापत्य, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, पर्यावरण, यांत्रिकी, विद्युत, संगणक अशा विविध अभियांत्रिकी क्षेत्रात यापुढील काळात नागरिकांना समाधानकारक अशा दर्जेदार सुविधा पुरविण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून काम केले जात असल्याचे सांगत महापालिका आयुक्तांना अभिप्रेत असलेली दैनंदिन कामांमध्ये आधुनिकता व नाविन्यता आणण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंता श्री. राजेंद्र कुमार सराफ यांचे स्मार्ट इंजिनिअरिंग ऑफ बेटर वर्ल्ड या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी उप अभियंता श्री. विवेक मुळे यांनी भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला तसेच उप अभियंता श्री. विश्वकांत लोकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Published on : 15-09-2022 14:34:15,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update