भाषा अभ्यासक श्री.वैभव चाळके यांनी हसत खेळत शिकविले नमुंमपा कर्मचा-यांना मराठी शुध्दलेखनाचे नियम
जास्तीत जास्त लोकांना कळावी या दृष्टीने प्रत्येक भाषेची प्रमाण भाषा निश्चित केली जात असून प्रमाण भाषेत लिहिल्यास त्याचे आकलन अधिकाधिक लोकांना होते त्यामुळे प्रमाण भाषेत लिहिणे व त्याचे नियम पाळणे गरजेचे असते. या दृष्टीने कोणत्याही भाषेचे व्याकरण हा अत्यंत महत्वाचा विषय असून तो जर हसत खेळत मनापासून शिकला तर त्यामध्ये गोडी वाढते असे मत व्यक्त करीत भाषा अभ्यासक श्री. वैभव चाळके यांनी सहज सोप्या पध्दतीने दिलखुलास संवाद साधत शुध्द लेखनाचे नियम पटवून दिले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या विविध उपक्रमात भाषा अभ्यासक श्री. वैभव चाळके यांनी शुध्द लेखनाचे नियम या विषयावर सादरीकरण करीत सोपी उदाहरण देत शुध्द कसे लिहावे या विषयी मार्गदर्शन केले.
शुध्द म्हणजे पवित्र नाही तर अचूक हे सुरुवातीलाच विषद करीत सध्या प्रमाण मराठी भाषेऐवजी मराठी इंग्लीश मिश्रीत मिंग्लीश ही वेगळीच भाषा ऐकायला मिळते असे त्यांनी सांगितले. सध्या जगण्याची भाषा महत्वाची झाली असून आपली जीवनभाषा आपल्याला कळायला हवी असा हा काळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बहुतांशी मुले इंग्रजी माध्यमांत शिकतात व त्याना मराठी भाषाही शिकविली जाते. मात्र घरात त्यांच्याशी बोलताना इंग्रजी मिश्रित मराठीत बोलले जाते त्यामुळे धड ना इंग्रजी, ना मराठी अशा संभ्रमात त्या मुलाचा भाषा विकास होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मुलाच्या भाषिक जाणीवा विकसित होण्याच्या दृष्टीने पालकांनी सजग रहावे असेही ते म्हणाले.
मराठी शुध्द लेखनाचे 18 शासकिय नियम दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देत अविष्कृत करताना श्री. वैभव चाळके यांनी मराठी भाषेच्या ऐश्वर्य संपन्न नजाकतीचे दर्शन घडविले. –हस्व किंवा दीर्घ वेलांटी तसेच ऊकार याबाबत बहुतांशी लोकांमध्ये संभ्रम असून त्या दृष्टीने महत्वाचे तीन नियम त्यांनी सांगितले.
शुध्द लेखनामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली भाषा अचूक पोहचते असे सांगत भाषा अभ्यासक श्री. वैभव चाळके यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी यासाठी पुढाकार घेतला त्याबद्दल प्रशंसा केली.
समाजविकास विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी आपल्या दररोजच्या कामकाजात नस्तीची टिपणी तसेच पत्र लेखन यामध्ये मराठी शुध्दलेखन महत्वाचे असून त्यादृष्टीने हा विशेष उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले.
दि. 20 जानेवारी रोजी सायं. 4 वा. महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात ‘कविता डॉट कॉम’ ही नवी मुंबईतील कवींची जिंदादील काव्यमैफल संपन्न होणार असून त्यामध्ये कवी प्रा. रविंद्र पाटील, श्री. जितेंद्र लाड, श्री. वैभव व-हाडी, श्री. शंकर गोपाळे, श्री. नारायण लांडगे पाटील, श्री. रुद्राक्ष पातारे आणि गझलकार डॉ. कैलास गायकवाड सहभागी होणार आहेत.
Published on : 19-01-2023 11:39:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update