एसएस 2021 म्युझिकल नाईटमध्ये श्री.शंकर महादेवन करणार स्वच्छतेचा संगीतमय ऑनलाईन जागर
जगप्रसिध्द गायक संगीतकार आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँम्बेसेडर श्री. शंकर महादेवन उद्या 12 मार्चला रात्री 8 वा. "स्वच्छ सर्वेक्षण एसएस 2021 म्युझिकल नाईट" या व्हर्च्युअल इव्हेन्टमध्ये त्यांच्या लोकप्रिय गाण्यांसोबतच नवी मुंबईकर नागरिकांना प्रोत्साहीत करीत स्वच्छतेचा ऑनलाईन संगीत जागर करणार आहेत. www.SS2021MusicalNight.com या लिंकवरून नवी मुंबई निवासी नागरिकांप्रमाणेच जगभरातील स्वच्छता व संगीतप्रेमी नागरिक या संगीतसंध्येचा आस्वाद घेऊ शकतात.
स्वच्छ सर्वेक्षणात नेहमीच आपले मानांकन उंचावणारे शहर म्हणून नवी मुंबई आघाडीवर राहिले असून शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मी नवी मुंबईचा रहिवाशी आहे याचा मला सार्थ अभिमान असल्याचे मत श्री. शंकर महादेवन नेहमीच व्यक्त करीत असतात. म्हणूनच या संगीत सोहळ्याव्दारे नवी मुंबईकर नागरिकांच्या मनात स्वच्छतेची ज्योत जागवून यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला नंबर मिळवायचाच हा निश्चय रूजविण्यासाठी स्वत: श्री. शंकर महादेवन यांनी पुढाकार घेतला आहे.
त्या अनुषंगाने 19 फेब्रुवारी ते 11 मार्च 2021 या कालावधीत स्वच्छतेची सवय लागावी यादृष्टीने "स्वच्छता सवयीचे 21 दिवस चॅलेंज (#21DAYSCHALLENGE)' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा व त्यातही महिला आणि युवावर्गाचा उत्तम प्रतिसाद लाभला.
या 21 दिवसांच्या स्वच्छता चॅलेंज मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणा-या विजेत्या नागरिकांना या ऑनलाईन म्युझिकल नाईटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आणि संगीतकार गायक श्री. शंकर महादेवन यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
यामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणा-या 5 नागरिकांना 'आय फोन 12 मिनी' हा मोबाईल फोन बक्षिस स्वरूपात दिला जाणार आहे, तसेच 25 हून अधिक इतर आकर्षक पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
तरी सर्व संगीतप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी या स्वच्छ सर्वेक्षण 2021 म्युझिकल नाईटमध्ये आपल्या घरी संगणक अथवा लॅपटॉपवरून अथवा मोबाईलवरून कुठूनही या 1 तासाच्या संगीतसोहळ्याचा आनंद घ्यावा आणि श्री. शंकर महादेवन यांच्यासमवेत नवी मुंबईकर नागरिक म्हणून स्वच्छतेत देशात पहिल्या नंबरचा निश्चय करून तो कृतीत आणावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 11-03-2021 12:36:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update