नवी मुंबईत 28 मे रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रविवार, दि. 28 मे 2023 रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ करण्यात येणार असून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले आहे.
भारत देश पोलिओमुक्त आहे. परंतू काही देशांमध्ये अद्याप पोलिओ असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो यासाठी पल्स पोलिओ मोहीम राबविली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 0 ते 5 वर्ष वयोगटामधील अपेक्षित 90897 बालकांच्या लसीकरणाचे लक्ष्य नजरेसमोर ठेऊन मोहीमेचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याकरिता 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात 604 स्थायी बूथ, 94 ट्रान्झिट बूथ आणि 28 फिरते (मोबाईल) बूथ असे एकूण 726 बुथ कार्यरत असणार आहेत. या लसीकरण मोहिमेसाठी मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा वर्दळीच्या ठिकाणी ट्रान्झिट व फिरती मोबाईल पथके तयार करण्यात आलेली आहेत.
त्याचप्रमाणे मोहीमेच्या सुनियोजित आयोजनाच्या दृष्टीने महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री संजय काकडे यांच्या अध्यक्षेतखाली सिटी टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली असून नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे. तसेच पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्याकरिता वैद्यकीय अधिकारी, एनएम, एलएचव्ही, एएनएम, आशा व स्वयंसेवक यांचे रितसर प्रशिक्षणही घेण्यात आलेले आहे.
पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेच्या दिवशी बाळाच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने बूथवरील स्वयंसेवकांनी बाळाला आपल्या हाताचा स्पर्श होणार नाही याची काळजी घेणे तसेच बाळाच्या डाव्या कंरगळीवर पेनने खूण करताना बाळाचा हात स्वत: न पकडता त्याची आई अथवा पालक यांना हात पकडण्यास सांगणे अशा छोट्याछोट्या पण महत्वाच्या गोष्टी प्रशिक्षणात सांगण्यात आलेल्या आहेत.
या मोहीमेची माहिती व्यापक स्वरूपात जनमानसात प्रसारित होण्याकरिता महापालिका कार्यक्षेत्रात जनजागृतीपर पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले असून महानगरपालिकेच्या सोशल माध्यमांवरूनही मोहीमेची प्रसिध्दी करण्यात आलेली आहे.
या पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत ज्या बालकांना दि. 28 मे 2023 रोजी काही कारणास्तव डोस दिला गेला नाही तर त्याचेही नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले असून त्यानंतर घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी 881 टिमव्दारे गृहभेटींमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक टिमचे कार्यक्षेत्रनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे.
तरी पालकांनी आपल्या बालकाच्या संपूर्ण सुरक्षिततेच्या दृष्टीने 28 मे रोजीच्या देशव्यापी मोहीमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकाला पल्स पोलिओ लसीचा डोस द्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 25-05-2023 10:00:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update